भुसावळ तालुक्यातील सामूहिक पाणीपुरवठा यंंत्रणा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 04:37 PM2018-11-18T16:37:32+5:302018-11-18T16:39:30+5:30
वरणगाव, ता. भुसावळ , जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील चार गावाची सामूहिक पाणीपुरवठा यंत्रणा विजेअभावी दोन दिवसांपासून ठप्प पडली आहे. ...
वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील चार गावाची सामूहिक पाणीपुरवठा यंत्रणा विजेअभावी दोन दिवसांपासून ठप्प पडली आहे. यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत.
अंजनसोडे, कठोरा बुद्रूक, कठोरा खुर्द, फुलगाव या चार गावांची सामूहिक पाणीपुरवठा यंत्रणा आहे. या यंत्रणेवर वीज वितरण कंपनीचे ३० लाखांहून अधिक वीज बिल थकीत आहे. यामुळे या योजनेची वीजजोडणी राज्य वीज वितरण कंपनीतर्फे खंडित करण्यात आली आहे. परिणामी पाणीपुरवठा बंद पडल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असतानाही वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेली कारवाई ही अन्यायकारक असल्याची भावना जनमानसात उमटत आहे.
सतत बंद पडणारी योजना
चार गावाची सामूहिक पाणीपुरवठा करणारी ही योजना कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत बंद पडत असते. कधी तांत्रिक कारणाने तर कधी वीज बिल थकबाकीपोटी वीज कनेक्शन तोडल्याने, तर कधी पाईप लाईनच्या गळतीमुळे तर कधी जलशुद्धीकरण यंत्रणेमुळे वारंवार बंद पडते. यामुळे नागरिक हैराण झाले आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेची गरज
सामूहिक पाणीपुरवठा यंत्रणा ३५ वर्षे जुनी आहे. ही योजना मोडळकीस आल्याने योजनेस कालबाह्य ठरविण्यात आले आहे. त्याकरिता नूतन पाणीपुरवठा योजना उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालण्याची त्रस्त नागरिकांची मागणी आहे.