वाद घालणाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:16 AM2021-04-25T04:16:10+5:302021-04-25T04:16:10+5:30
जळगाव : जिल्हाधिकारी मुख्य सचिवांच्या व्हीसीमध्ये व्यस्त असताना कार्यालयात वाद घालणाऱ्या नायब तहसीलदार व लिपिक यांचा अहवाल मागविण्यात आला ...
जळगाव : जिल्हाधिकारी मुख्य सचिवांच्या व्हीसीमध्ये व्यस्त असताना कार्यालयात वाद घालणाऱ्या नायब तहसीलदार व लिपिक यांचा अहवाल मागविण्यात आला असून, त्यांना समज देण्यात येईल, प्रसंगी कारवाई देखील केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.
शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे मुख्य सचिवांच्या व्हीसीमध्ये व्यस्त असताना खाली कार्यालयांमध्ये एक नायब तहसीलदार आले व त्यांनी लिपिकास शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. यावेळी प्रलंबित कामावरून संबंधित नायब तहसीलदार यांनी लिपिकास शिवीगाळ देखील केली व आमदारांची कामे देखील करीत नाही का, असा जाब विचारला होता.
याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर याविषयी अहवाल मागविला आहे. कोरोनाच्या या काळात उपाययोजना सुरू असताना असे वाद घालू नये, हे संबंधितांना समजले पाहिजे, त्यामुळे त्यांना समज देण्यात येणार असून, प्रसंगी कारवाई देखील केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी राऊत यांनी दिला आहे.