शनिवार, रविवार दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 09:41 AM2020-10-06T09:41:54+5:302020-10-06T09:42:19+5:30
जळगाव - शहरातील सर्व दुकाने आठवड्याचे सात दिवस सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत उघडी रहावी, यासाठी जळगाव जिल्हा ...
जळगाव - शहरातील सर्व दुकाने आठवड्याचे सात दिवस सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत उघडी रहावी, यासाठी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असून मनपा आयुक्त रजेवरून हजर झाल्यावर याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने दुकाने आणि इतर सुविधा सुरू होत असल्या तरी जळगाव शहरात मात्र अद्यापही शनिवार, रविवार दुकाने बंदच ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच दररोज सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंतच उघडण्यास प्रशासनाने अनुमती दिलेली आहे. व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेता जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देऊन त्यांची भेट घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे सचिव ललित बरडीया, कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दुकानांची वेळ वाढविण्यासंदर्भात शासनाच्या निर्देशानुसार निर्णय घेण्यात येईल तर शनिवार आणि रविवारी दुकाने उघडी राहावी, यासाठी लवकरच आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.