सरकारच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’मधील कॉलेज जळगावात सुरू
By अमित महाबळ | Published: September 8, 2022 03:55 PM2022-09-08T15:55:38+5:302022-09-08T16:08:47+5:30
जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांमध्ये शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाची भर पडली असून, येत्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.
जळगाव :
जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांमध्ये शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाची भर पडली असून, येत्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. अधिष्ठातापदी डॉ. अविनाश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या जागेतच हे महाविद्यालय सुरू होत आहे.
जळगाव जिल्ह्यात चिंचोलीला मेडिकल हब मंजूर असून, त्यामध्ये वैद्यकीय (एमबीबीएस), आयुर्वेद, दंत, होमिओपॅथी, फिजिओथेरेपी महाविद्यालये मंजूर आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात एप्रिल २०१७ मध्ये याची घोषणा झाली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मेडिकल हब ओळखले जाते. या ठिकाणी सर्वात आधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे काम होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत.
वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयाच्या जागेत, तर आयुर्वेद महाविद्यालय शिरसोली रस्त्यावरील भाड्याच्या इमारतीत
सुरू झाले असून, आता होमिओपॅथी कॉलेजचा मार्ग मोकळा झाला आहे. या कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. अविनाश महाजन आणि निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. रितेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील हे पहिलेच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आहे. त्या दृष्टीने त्याचे महत्त्व अधिक आहे.
पहिली बॅच ५० विद्यार्थ्यांची
येत्या शैक्षणिक सत्रापासून होमिओपॅथीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. पहिली बॅच ५० विद्यार्थ्यांची आहे. सद्यस्थितीत आयुर्वेद महाविद्यालयाच्या परिसरातच कॉलेजला जागा मिळाली आहे. मात्र, कॉलेज व रुग्णालयासाठी प्रशस्त जागेचा शोध घेतला जात आहे.
जळगावकरांना मिळणार ओपीडी
कॉलेजसाठी नऊ शिक्षक व रुग्णालयासाठी चार वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती कंत्राटी तत्वावर करण्यात आली आहे. या कॉलेजमुळे होमिओपॅथीची बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी) जळगावकरांना उपलब्ध होणार आहे.
अशी होईल प्रवेश प्रक्रिया
नीटचा रिझल्ट लागल्यानंतर गुणवत्ता यादीनुसार, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमस या पद्धतीने विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पार पडेल. याशिवाय विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व गुणवत्तेनुसार विद्याशाखेचा प्राधान्यक्रम निवडून शकतात, अशी माहिती मिळाली.