जळगावात नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तरुणाकडून धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:36 PM2018-07-31T12:36:37+5:302018-07-31T12:36:52+5:30
महाविद्यालयाला सुट्टी न दिल्याचे कारण : तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल नाही
जळगाव : ‘मविप्र’ संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांच्या निधनामुळे महाविद्यालयाला सुटी का दिली नाही, या कारणावरुन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी.देशमुख यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार सोमवारी महाविद्यालयात घडला. एका कार्यकर्त्याने धक्काबुक्की केली. मात्र प्राचार्यांनी तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली.
नरेंद्र पाटील यांचे रविवारी पुण्यात उपचार सुरु असताना निधन झाले. सोमवारी नेरी नाका स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने तत्पूर्वी त्यांचे पार्थिव नूतन मराठा महाविद्यालाच्या प्रवेशद्वाजवळ आणण्यात आले होते. तेथे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम संपताच एका कार्यकर्त्याने महाविद्यालयाला सुटी का दिली नाही म्हणून प्राचार्य देशमुख यांच्याशी वाद घातला. यावेळी त्याने धक्काबुक्की केली. सुटी दिली असती तर विद्यार्थी आले नसते, त्याशिवाय रविवारी महाविद्यालयाला सुटी असल्याने शेकडो विद्यार्थ्यांना हा निरोप देणेही शक्य नव्हते. महाविद्यालय सुरु ठेवल्यामुळे सर्वच विद्यार्थी व प्राध्यापकांना आदरांजलीसाठी उपस्थित राहता आले.
हा कार्यक्रम संपल्यानंतर सुटीच दिली जाणार असल्याचे स्पष्टीकरण प्राचार्यांनी दिले होते, तरीही हा धक्काबुक्कीचा प्रकार घडला.
ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील यांच्या निधनानंतर आम्ही सोमवारी सकाळी साडेसात वाजताच नूतन मराठा महाविद्यालयाला सुटी जाहिर केली होती. त्यानंतर श्रद्धांजली सभादेखील घेतली. अंत्ययात्रा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येणार असल्याने माझ्यासह सर्व कर्मचारी अंत्यदर्शन घेण्यासाठी त्याठिकाणी एकत्र आलो. या दरम्यान काही जणांनी आपल्याला धक्काबुक्की केली. धक्काबुक्की कशसाठी आणि कुणी केली हे आपल्याला माहित नाही. या दरम्यान हल्लेखोरांनी प्रयोगशाळा साहाय्यक रवींद्र भागवत घुगे व शिपाई कैलास पाटील यांना देखील शिवीगाळ व मारहाण केली.
- डॉ.एल.पी.देशमुख, प्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय