कोरोनाकाळातही प्रवाशांची कोंबून वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:08+5:302021-04-08T04:16:08+5:30
सोशल डिस्टनिंगचा फज्जा : नियमा प्रमाणे रिक्षात प्रवाशांची संख्या दिसेना जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन ...
सोशल डिस्टनिंगचा फज्जा : नियमा प्रमाणे रिक्षात प्रवाशांची संख्या दिसेना
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी परिवहन विभागाने रिक्षाचालकांना रिक्षात दोनच प्रवाशांना बसविण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही शहरातील रिक्षाचालक हे आदेश धाब्यावर बसवून अगदी बिनधास्तपणे रिक्षात तीन ते चार प्रवाशांना बसवून वाहतूक करत असल्याचे बुधवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.
गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला सुरुवात झाली असून, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. प्रत्येकाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून, नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाईदेखील करण्यात येत आहे. दोनच दिवसांपूर्वी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी विनामास्क रिक्षा चालविणाऱ्या दोन रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली होती. तसेच रिक्षाचालकांना प्रवाशी वाहतूक करताना रिक्षाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे, मास्क घातलेल्या प्रवाशांनाच बसविणे व मुख्य म्हणजे रिक्षात प्रवाशी बसविताना सामाजिक अंतर ठेवून दोनच प्रवाशांना बसविण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा अशा रिक्षांवर कडक कारवाईचे आदेशही दिले आहेत. मात्र, आरटीओ विभागाकडून प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने, रिक्षाचालकांचे फावले आहे.
इन्फो : वर्दळीच्या चौकातून बिनधास्तपणे होतेय कोंबून वाहतूक
‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून शहरातील रेल्वे स्टेशन, आकाशवाणी चौक, बेंडाळे चौक, प्रभात चौक व अजिंठा चौफुलीवरून अगदी बिनधास्तपणे रिक्षाचालक रिक्षात तीन ते चार प्रवाशांना बसवून वाहतूक करताना दिसून आले. यात रेल्वे स्टेशनवरून काही रिक्षाचालक मागे चार प्रवाशी, तर पुढे दोन अशा प्रकारे एका रिक्षात तब्बल सहा प्रवाशांची वाहतूक करताना दिसून आले तसेच आकाशवाणी चौकातूनही अजिंठा चौफुलीकडे जाणारे रिक्षाचालकही तब्येतीने बारीक प्रवाशी असले तर मागे चार प्रवाशी व त्यात शरीराने एखादा जाड प्रवाशी असल्यास त्या प्रवाशाला पुढे बसवून मागे तीन प्रवाशी बसवीत असल्याचे दिसून आले. असाच प्रकार अजिंठा चौफुलीवरून सुप्रीम कॉलनीकडे जाणाऱ्या रिक्षांमध्येही दिसून आला.
इन्फो :
प्रवाशांकडूनही विरोध होईना
रेल्वे स्टेशनवर एका रिक्षाचालकाने नवीन बस स्टॅण्डवर जाणारे चार प्रवाशी बसविले. यात एक ज्येष्ठ नागरिक व तीन तरुण होते. चार जणांना बसता येणे शक्य नसतानाही, यातील एकाही प्रवाशाने विरोध न करता, दाटीवाटीने बसून बस स्टॅण्डकडे रवाना झाले. यात दोन्ही बाजूकडील प्रवाशांचा एक पाय बाहेरच होता. या दुसऱ्या वाहनाचा धक्का लागून, त्या प्रवाशाला दुखापत होण्याची शक्यता दिसून आली, तर कुणीही याला विरोध केला नाही. असाच प्रकार बेंडाळे चौकाकडून अजिंठा चौफुलीवर दिसून आला. याबद्दल ‘लोकमत’ प्रतिनिधीने काही प्रवाशांशी संवाद साधला असता, त्यांनी पाच ते दहा मिनिटांचा प्रवास असतो, त्यामुळे थोडा त्रास सहन करून घ्यावा लागतो, स्पेशल रिक्षा केली तर जास्त पैसे लागतात. त्यामुळे या त्रासाबद्दल काही वाटत नसून, ही सवयच झाली असल्याचे सांगितले.
इन्फो :
तर रिक्षाचालक म्हणतात, आम्हालाही परवडले पाहिजे..
प्रवाशांची कोंबून वाहतूक करण्याबाबत काही रिक्षाचालकांना विचारले असता, त्यांनी एक किंवा दोन प्रवाशांनी वाहतूक करणे परवडत नाही. डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. जास्त भाडे आकारायचे म्हटल्यावर अनेक प्रवाशी तेदेखील देत नाहीत. त्यामुळे १० रुपये शीटप्रमाणे एका रिक्षात नाइलाजाने कधी तीन तर कधी पाच प्रवाशांची वाहतूक करावी लागत असल्याचे सांगितले.