आओ जाओ घर तुम्हारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:15 AM2021-03-19T04:15:33+5:302021-03-19T04:15:33+5:30

रिॲलिटी चेक जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ही महाराष्ट्रात दुसरी लाट आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले ...

Come and go home! | आओ जाओ घर तुम्हारा !

आओ जाओ घर तुम्हारा !

Next

रिॲलिटी चेक

जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून ही महाराष्ट्रात दुसरी लाट आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. दुसरीकडे जिल्हा, तालुका व इतर राज्यातील येणाऱ्या लोकांची बसस्थानक, रेल्वे स्थानक यासह जिल्हा सीमा आदी ठिकाणी तपासणी केली जात नसल्याचे ‘लोकमत’ ने घेतलेल्या पाहणीत दिसून आले. एकंदरीतच ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून खासगी व सरकारी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात ९९६ नवे रुग्ण वाढले तर ५३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत ८ हजार ५५० रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ७३ हजार ५७१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत तर १४६२ जणांचा कोरोनाने जीव घेतलेला आहे. जळगाव जिल्हा देशातील टॉप १० मध्ये आलेला असल्याने विशेष खबरदारी घेणे गरजेचे असताना बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांबाबत कुठलीच खबरदारी घेतली जात नाही.

बसस्थानक (फोटो)

नाशिक, औरंगाबादकडून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी नाही

- गुरुवारी दुपारी १२ वाजता नवीन बसस्थानकात ३० मिनिटे थांबून निरीक्षण केले असता नाशिक, औरंगाबाद, धुळे, जामनेर, पाचोरा येथून आलेल्या बसमधील कोणत्याच प्रवाशाची तपासणी झाली नाही. नेहमीपेक्षा गुरुवारी वर्दळ कमी होती.

-कोणत्याच प्रवाशाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, पत्ता घेतला गेला नाही किंवा त्यांना क्वारंटाईन केले गेले नाही. प्रवाशांची तपासणीच होत नसल्याने कोणाला कोरोनाचा लागण झाली हे कळू शकत नाही

- बसमधून उतरलेल्या प्रवाशांची तपासणी तर सोडाच स्वत: चालक, किंवा वाहकाने मास्कचा वापर केलेला नव्हता. प्रवाशी बिनधास्त असल्यासारखे वागत होते. बाहेर थांबलेले रिक्षा चालक प्रवाशी मिळविण्याची धडपड करीत होते, पण त्यांनीही मास्क लावलेला नव्हता.

रेल्वेस्थानक (फोटो

मुंबईकडून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक

-रेल्वे स्थानकावरही अशीच परिस्थिती होती. मोठ्या संख्येने प्रवाशी रेल्वेतून उतरले, काहींच्या तोंडाला तर मास्कही नव्हते. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची ना वैद्यकिय तपासणी केली जात होती, ना सॅनिटायझेशनही केले जात होते. बिग बाजारच्या दिशेने जिन्याजवळ प्रवाशांची थर्मल स्क्रिनींग केली जात होती तर शिवाजी नगराकडून कुठलीच तपासणी केली जात नव्हती.

-जळगावला उतरणाऱ्यांमध्ये मुंबई, नाशिक व पुण्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. एरव्ही मुंबई, कल्याण ही दोन शहरे हॉटस्पॉट ठरत आहेत, तरी देखील तिकडूनच येणाऱ्या प्रवाशांची फार तितकी काळजी किंवा खबरदारी घेतली गेली नाही.

जिल्हा सीमा (फोटो)

मध्य प्रदेशातून येणाऱ्यांची तपासणीच नाही

- जिल्ह्याच्या सीमा असलेल्या चोपडा, रावेर व मुक्ताईनगर आदी ठिकाणी बाहेर राज्यातून येणाऱ्या कोणत्याच वाहनात बसलेल्या प्रवाशांचा तोंडाला मास्क आहे किंवा त्यांची वैद्यकिय तपासणी केली जात नव्हती.

-थर्मल स्क्रिनींगही करण्यात येत नव्हती. किंबहूना अशी तपासणी करणारी यंत्रणाच काही ठिकाणी नव्हती. मालेगाव, नाशिककडून येणाऱ्या वाहनांसाठी पिंपरखेडजवळ गेल्यावर्षी तपासणी नाके होते, यंदा तशी व्यवस्थाच नाही.

वाढत्या संसर्गात जनता कर्फ्यू लागू

जळगाव शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरु लागल्याने त्याची साखळी तोडण्यासाठी गेल्या आठवड्यात शहरात तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तालुका पातळीवरही हाच निर्णय घेतला जात आहे. त्याशिवाय लसीकरणाची संख्या वाढविण्यावर प्रशासनाने भर दिलेला आहे. आस्थापनांसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर कोणतेही आस्थापना सुरु राहिल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. जळगाव शहरात या नियमांचे तंतोतंत पालन होताना दिसून येत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने दवाखाने फुल्ल झाले आहेत त्यामुळे पर्याय म्हणून कमी लक्षणे असलेल्यांना होमआयसोलेशन मध्ये उपचार केले जात आहेत.

Web Title: Come and go home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.