बंगालमध्ये प्रचार करून जळगावबाबत टीका करण्यापेक्षा मैदानात या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:15 AM2021-04-13T04:15:00+5:302021-04-13T04:15:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून, याबाबत बंगालमध्ये निवडणुकीसाठी प्रचाराला गेलेल्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून, याबाबत बंगालमध्ये निवडणुकीसाठी प्रचाराला गेलेल्यांनी त्याठिकाणाहून जिल्ह्यातील परिस्थितीबाबत न बोलता थेट रस्त्यावर येवून काम करण्याची तयारी दर्शवावी, टीका करण्यापेक्षा मैदानात येवून काम करा, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे.
माजी मंत्री गिरीश महाजन हे सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. मात्र, त्याठिकाणाहून देखील महाजन यांनी राज्य व जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत शासनावर टीका केली होती. पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना सोमवारी विचारले असता, महाजन यांच्या टीकेला उत्तर दिले. तसेच खा. उदयनराजे भोसले यांनी राज्य शासनावर केलेल्या टीकेलादेखील गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत, उदयनराजे यांनी आधी भाजपच्या लोकांना समजावे त्यानंतरच टीका करावी, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
लॉकडाऊनबाबत शासन गंभीर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाकडून लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.
ज्यांची वीज कापली गेली त्यांनी अशा वल्गणा करू नये
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सोलापुरात मतदान झाल्यानंतर शिवसेनेची वीज कापली जाईल, असे वक्तव्य केले होते. त्यावरदेखील गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत ज्यांची आधीच वीज कापली गेली आहे. त्यांनी दुसऱ्यांची वीज कापण्याबाबत वल्गना करू नयेत अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी फडणवीस यांना उत्तर दिले.