पावसाच्या ‘कमबॅक’ने शेतशिवार झालं आबादानी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:17 AM2021-07-26T04:17:14+5:302021-07-26T04:17:14+5:30
भुसावळ : सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने दडी मारली होती. यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता, मात्र पावसाच्या ‘कमबॅक’ने हंगामाच्या सुरुवातीला ...
भुसावळ : सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने दडी मारली होती. यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता, मात्र पावसाच्या ‘कमबॅक’ने हंगामाच्या सुरुवातीला अर्ध्या तालुक्यात अतिवृष्टी, तर अर्धा तालुका कोरडा अशी स्थिती होती. मात्र १५ जुलैनंतर तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात खरिपाची पेरणी जवळपास ७० टक्के पूर्ण झाली आहे. सध्या सर्वत्र पिकांची कोळपणी, औषध फवारणी व निंदणीच्या लगबगीतून कष्टकऱ्यांनी शेतशिवार फुलून गेले आहे.
तालुक्यात यंदा जून महिन्यात पावसाने दगा दिला. काही भागात तुरळक पाऊस तर काही भागात टिपूसही नाही, अशी स्थिती होती. ज्या भागात पेरण्या झालेल्या होत्या. त्या पेरण्यादेखील उलटण्याची स्थिती उदभवली होती. पिके करपू लागली होती; मात्र थोड्या उशिराने दाखल झालेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली. सोबतच रखडलेल्या पेरण्यादेखील पूर्ण झाल्या पेरणीनंतरही पावसाने उसंत दिली. त्यामुळे पेरण्या उलटण्याचीही भीती होती; मात्र गत आठवड्यात तालुक्यात सर्वत्र समाधानकारकरित्या पाऊस बरसला असल्याने सध्या खरिपाची पिके जोमात आहेत. या पिकांत शेतकरी आता कोळपे मारून व निंदण करून तण काढत आहेत.
सोबतच पिकांवरील कीड व विविध रोगांचा अटकाव करण्यासाठी औषध फवारणी चालविली आहे. तालुक्याचे प्रमुख सोयाबीनचे पीक काही भागात पिवळे पडत असल्याने शेतकरी सोयाबीन पिकावरदेखील औषधी फवारणी व खतांचा 'बुस्टर’ डोस देताना दिसत आहेत.
शेतशिवारात सर्वत्र पिके डोलू लागली आहेत. तालुक्यातील पूर्वकडील भागात जास्त पाऊस पडलेला असल्याने या भागातील पिके जोरदार बहरली आहेत. या भागातील शेतकऱ्यांना आता पावसापासून थोडी उसंत हवी आहे. आतापर्यंतच्या पावसाने शेतशिवारात सर्वत्र आबादानी असून पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने बळीराजा सुखावलेला आहे.