दिलासा...शहराचा रिकव्हरी रेट ९६ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:14 AM2021-05-28T04:14:13+5:302021-05-28T04:14:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग गेल्या आठवडाभरापासून घटला आहे. शहरात सरासरी ७०० चाचण्या केल्या जात असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग गेल्या आठवडाभरापासून घटला आहे. शहरात सरासरी ७०० चाचण्या केल्या जात असून, आता यात बाधितांचे प्रमाण दीड टक्क्यांवर आले आहे. आठवडाभरापासून शहराची पॉझिटिव्हिटी ही पाच टक्क्यांच्या खाली आहे. यात कडक निर्बंध, नियम पाळणे ही कारणे आहेतच, यासह विषाणूची तीव्रता कमी झाल्याचाही हा परिणाम असू शकतो, असे काही तज्ज्ञ सांगतात.
शहरात गुरुवारी २२ बाधित आढळून आले आहेत. तर, २४ रुग्ण बरे देखील झाले आहेत. दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात ८३ वर्षीय पुरुष व ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हाभरातच कोरोनाचा संसर्ग घटत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. चाळीसगाव तालुक्यात सध्या सर्वाधिक ८६० सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही ६५३९ वर आली आहे. मृतांमध्ये एरंडोल, पारोळा, रावेर, भुसावळ या ठिकाणी प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
शहराचा रिकव्हरी रेट ९६ टक्के
शहरातील एकूण ३२,५५४ रुग्णांपैकी ३१,४२७ रुग्ण कोरोनातून बरे झालेले आहेत. हे प्रमाण ९६ टक्के आहे. जिल्ह्याच्या तुलनेत शहराचा रिकव्हरी रेट हा ३ टक्के अधिक आहे. शहरातील ५६४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण हे कमी झाले आहे.
दहा व्हेंटिलेटरचे लोकार्पण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड म्युकरमायकोसिस या कक्षाचे तसेच लहान मुलांच्या दहा व्हेंटिलेटर्सचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सायंकाळी पावणेपाच वाजता होणार आहे. यावेळी आढावा बैठकही आयोजित करण्यात आली आहे.
असा आठवडा
२१ मे चाचण्या ८३२, बाधित १३, प्रमाण १.५६ टक्के
२२ मे चाचण्या ९०८, बाधित २१, प्रमाण २.३१ टक्के
२३ मे चाचण्या ३६०, बाधित १३, प्रमाण ३.३३ टक्के
२४ मे चाचण्या ७२३, बाधित ३०, प्रमाण ४.१० टक्के
२५ मे चाचण्या ८००, बाधित २१, प्रमाण २.६२ टक्के
२६ मे चाचण्या ५०५, बाधित १८, प्रमाण ३.५६ टक्के
नागरिकांनी गाफील राहू नये
कोरोना कमी होतोय, असे समजून नागरिकांनी गाफील राहू नये, अन्यथा तिसऱ्या लाटेत उद्रेक होऊ शकतो, असा इशाराही तज्ज्ञ सध्या देत आहेत. पहिल्या लाटेनंतर तसेच चित्र पाहायला मिळाले होते. दुसऱ्या लाटेत गंभीर होण्याचे तसेच मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले होते. मात्र, ते हळूहळू कमी झाले. मात्र, पुढील उद्रेक थांबवायचा असेल तर नागरिकांनी तीन नियम पाळणे गरजेो आहे.
कोट
पॉझिटिव्हिटी ही सरासरी ५ टक्क्यांपेक्षा खाली आली आहे. १८ मेपर्यंत साधारण ७ ते १० टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटी होती. ती त्यानंतर कमी झालेली आहे. नागरिकांनी वैयक्तिक लॉकडाऊन ही संकल्पना पाळणे, त्यात तीन नियमांचे तंतोतंत पालन करणे, या बाबी पुढील धोके टाळू शकतात. सर्वांच्या सहभागातूनच ते शक्य होणार आहे.
- डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा