दिलासा...रुग्णालयांमधील ऑक्सिजनची मागणी ५० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:16 AM2021-05-08T04:16:16+5:302021-05-08T04:16:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिनाभरात अत्यंत आणीबाणीच्या स्थितीत असलेल्या ऑक्सिजनच्या मागणीत घट होत असून, खासगी रुग्णालयांचीही मागणी ...

Comfort ... Oxygen demand in hospitals at 50 per cent | दिलासा...रुग्णालयांमधील ऑक्सिजनची मागणी ५० टक्क्यांवर

दिलासा...रुग्णालयांमधील ऑक्सिजनची मागणी ५० टक्क्यांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या महिनाभरात अत्यंत आणीबाणीच्या स्थितीत असलेल्या ऑक्सिजनच्या मागणीत घट होत असून, खासगी रुग्णालयांचीही मागणी ५० टक्क्यांवर आली आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही १ मेट्रिक टनापर्यंतची दैनंदिन घट नोंदविण्यात आली आहे. रुग्ण घटत असल्याने हे दिलासादायक चित्र समोर आले आहे.

एप्रिल महिन्यात जिल्ह्याची ऑक्सिजनची मागणी ही थेट ५० टनापर्यंत पोहोचली होती. मात्र, पुरवठा त्या मानाने कमी होत असल्याने हा बॅकलॉग भरून काढण्यात प्रशासनाची मोठी कसरत होत हाेती. टँकरला उशीर झाल्यानंतर तर अधिकच तारांबळ उडत होती. अशा स्थितीत अनेक वेळा ग्रामीण रुग्णालयांतील रुग्णांना जळगावात हलवावे लागले होते. १ मे रोजीही अशीच बिकट परिस्थिती निर्माण झाली होती.

जीएमसीत दिलासा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सी-२ आणि सी- ३ कक्षासाठी एप्रिल महिन्यात दररोज २०० सिलिंडर्स लागत होते. हीच संख्या आता ८० ते ९० सिलिंडर्सवर आलेली आहे. शिवाय या ठिकाणी नियमित ८ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन लागत होते. तेच आता कधी साडेसात तर कधी ७ मेट्रिक टन एवढे लागत आहे. व्हेंटिलेटरवर रुग्ण जसे कमीअधिक होतात, तशी मागणी कमीअधिक होत असते, असे समितीचे प्रमुख डॉ. संदीप पटेल यांनी सांगितले.

जिल्ह्याला मुरबाड येथून ३५ मेट्रिक टन तर आयनॉक्स, रायगड येथून ५ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. या व्यतिरिक्त जीएमसीला स्वतंत्र १६ टनाचा पुरवठा असतो. हर्षित गॅस, शिवम गॅस आणि हिंदुस्थान गॅस एजन्सी या तीन ठिकाणी या लिक्विडचे ऑक्सिजनच होऊन ते रुग्णालयांना पुरविले जाते. जीएमसीत यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे.

आठवडाभरातील ऑक्सिजनवरील रुग्णांची स्थिती

३० एप्रिल १,५३१

१ मे १,३६४

२ मे १,३५२

३ मे १,३३८

४ मे १,३२४

५ मे १,२२७

६ मे १,२४०

आयसीयूतील रुग्ण

३० एप्रिल ८४६

१ मे ८२६

२ मे ८०८

३ मे ७६३

४ मे ६५८

५ मे ७४४

६ मे ७५८

असे आहे चित्र

जिल्ह्याला प्राप्त होणारे ऑक्सिजन : ४० मेट्रिक टन (प्रतिदिन)

यात ४ हजार ते ४५०० सिलिंडर्स ऑक्सिजन निर्मिती होते.

तीन एजन्सीजमध्ये ते उतरविले जातात. त्या ठिकाणाहून खासगी रुग्णालयांना सिलिंडर्सचा पुरवठा होतो.

रुग्णालयांकडून येणारी मागणी ही ५० टक्क्यांवर आली आहे.

कोट

जिल्ह्याला नियमित ४० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन येतो. आपण मागणी करीत असतो ती आपण कायम ठेवली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर रुग्णालयांची मागणी घटली आहे. ही मागणी ५० टक्क्यांवर आली आहे.

- डॉ. अनिल माणिकराव, औषध निरीक्षक

Web Title: Comfort ... Oxygen demand in hospitals at 50 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.