दिलासादायक ! जळगावसह नऊ तालुक्यांत कोरोना शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:14+5:302021-07-07T04:19:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. सोमवारी जळगाव शहरात एकही नवा रुग्ण आढळून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना विषाणूची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. सोमवारी जळगाव शहरात एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. एवढेच नव्हे, तर जळगाव तालुक्यासह ९ तालुक्यांमध्ये एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाही, तर जिल्ह्यात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नसल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यात नवीन १५ रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रशासनाची नाकाबंदी, बाजारपेठेत गस्त आणि कारवाई, आरोग्य विभागाच्या सर्वाधिक चाचण्या आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे सोमवारी जळगाव, चोपडा, पाचोरा, भडगाव, यावल, जामनेर, रावेर, मुक्ताईनगर तसेच बोदवड तालुक्यांत कोरोनाचा आकडा शून्यावर आल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र, तरी देखील दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
६८ रुग्ण बरे
जिल्ह्यातील विविध कोविड केअर केंद्रांवर ४६८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी सोमवारी ६८ रुग्ण कोरोनावर मात करीत घरी परतले आहेत. सद्यस्थितीला ४०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी १५१६ आरटीपीसीआर, तर २१७९ ॲन्टिजन चाचण्या करण्यात आल्या. १७० अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९७.९१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
आतापर्यंत २५७३ जणांचा मृत्यू
दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी दिवसभरात कोरोनामुळे जिल्ह्यात एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने २ हजार ५७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण १ लाख ४२ हजार ३७६ बाधितांपैकी १ लाख ३९ हजार ४०३ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. मृत्यू दर हा १.८१ टक्क्यांवर आहे.
जळगाव शहरासह ग्रामीण भागात एकही रुग्ण नाही...
काही दिवसांपूर्वी शहरात कोरोनाबाधित आढळून येणाऱ्यांची संख्या अधिक होती. कडक निर्बंध लागू केल्यानंतर प्रशासनाला कोरोनाला रोखण्यात यश आले. मात्र, अजूनही कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. परंतु, सोमवारी पुन्हा जळगाव शहरासह जळगाव ग्रामीण भागात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळून न आल्याने समाधान व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असताना, नागरिकांकडून देखील विशेष काळजी घेतली जात आहे.
जिल्ह्यात असे आढळले रुग्ण...
जळगाव शहर- ००, जळगाव ग्रामीण- ००, भुसावळ- ०१, अमळनेर- ०१, चोपडा- ००, पाचोरा- ००, भडगाव- ००, धरणगाव- ०१, यावल- ००, एरंडोल- ०१, जामनेर- ००, रावेर- ००, पारोळा- ०१, चाळीसगाव- ०९, मुक्ताईनगर- ००, बोदवड- ०० व इतर जिल्ह्यातील- ०१ असे एकूण १५ रुग्ण नवीन आढळून आले आहेत.
जीएमसीत २२ रुग्णांवर उपचार
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २२ कोरोना रुग्णांवर, तर १४ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. तसेच नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.