दिलासादायक....आता कोरोना संसर्गाचा उतरता आलेख सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:15 AM2021-04-14T04:15:13+5:302021-04-14T04:15:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून वाढत गेलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता स्थिरावली असून नवीन रुग्णसंख्येएवढेच रुग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून वाढत गेलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता स्थिरावली असून नवीन रुग्णसंख्येएवढेच रुग्ण बरेदेखील होत आहे. यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून पॉझिटिव्हिटी दरही कमी झाला असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. असे असले तरी प्रशासनाच्यावतीने सर्व उपाययोजना सुरूच राहणार असून पॉझिटिव्हिटी दर एक अंकी येईपर्यंत सर्वांचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.ए. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार उपस्थित होते.
आठ ते १० दिवसात रुग्णसंख्या घटणार
कोरोनाच्या या लाटेत उच्चांकी गाठली असून आता रुग्णवाढीचा आलेख वर जाण्यापेक्षा खाली येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. कोरोना लाटेची तीव्रता व करण्यात येत असलेल्या उपाययोजना यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या स्थिरावली आहे. यात चोपडा येथे रुग्णांची संख्या पाहता आता नियंत्रण मिळविले जात असून केवळ भुसावळ, जळगावातील काही भाग, एरंडोल, जामनेर येथे नियंत्रण आवश्यक असून तेथेदेखील लवकरच रुग्णसंख्या कमी होईल व येत्या आठ ते १० दिवसात जिल्ह्यातील नवीन रुग्णसंख्या व ॲक्टिव्ह रुग्णही कमी होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला. यात ४ एप्रिलची संख्या पाहता ५ रोजी ती ३० ने कमी झाली. त्यानंतर मध्यंतरी स्थिरावली व आता पुन्हा कमी झाली असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १२ हजारावरून १० हजार ५८९वर आली आहे.
वेळेवर उपचार घेतल्यास रेमडेसिविर व ऑक्सिजनचीही गरज नाही
जिल्ह्यात अजूनही अनेक जण वेळेवर तपासणी करीत नाहीत. त्यामुळे प्रकृती खालावून रुग्णसंख्या व त्यातही गंभीरतेचे प्रमाण वाढत आहे. वेळेवर तपासणी केल्यास रेमडेसिविर व ऑक्सिजनचीही गरज पडणार नाही, त्यामुळे सर्वांनी लक्षणे जाणवताच तपासणी करावी असे आवाहनही जिल्हाधिकारी राऊत यांनी केले.
लस दाखल, तीन दिवसात लसीकरण पूर्ण करा
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लस संपली होती. त्यामुळे लसीकरण थांबले होते. आता जिल्ह्यासाठी ४० हजार ९०० युनिट मिळाले असून जिल्ह्यातील १३३ केंद्रांवर लसीकरणाला मंगळवारीच सुरूवात झाली. या उपलब्ध लसींद्वारे तीन दिवसात लसीकरण पूर्ण करायचे असून तशा सूचना देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
नवीन वर्षात आरोग्याची गुढी
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बरे होणारे व नवीन रुग्ण संख्या बरोबरीत असून काही दिवस बरे होणारे जास्त असल्याचे आढळून आले. आता समतोल परिस्थिती आली असून रुग्णवाढीचा आलेख आता उतरता झाला आहे. गुढीपाडव्याला ही सकारात्मक बाब असून आरोग्याची गुढी उभारू व जिल्हावासीयांना पुढील वर्ष आरोग्यदायी जाण्यासाठी प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.
अमळनेरला रेमडेसिविरचा अनावश्यक वापर
जिल्ह्यात दोन हजार रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असल्यास मागणी पाच हजार इंजेक्शनची होते, असे चित्र असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले. यात ज्यांना आवश्यकता नाही त्यांनाही ते दिले जात असून अशाच प्रकारे स्कोअर तीन असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर दिले गेल्याचे अमळनेर येथे आढळून आल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.