आगामी काळात दारूबंदीसाठी आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:48 PM2019-03-08T12:48:03+5:302019-03-08T12:48:09+5:30

सप्टेबर महिन्यात रथयात्रा काढणार

In the coming days, the agitation for drinking | आगामी काळात दारूबंदीसाठी आंदोलन करणार

आगामी काळात दारूबंदीसाठी आंदोलन करणार

Next
ठळक मुद्दे भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांची ‘लोकमत’ ला माहिती


जळगाव : एक - दोन ठिकाणी दारूबंदी करून उपयोग नाही तर संपूर्ण महाराष्टÑ दारूमुक्त झाला पाहीजे, यासाठी भविष्यात आंदोलन करण्यात येईल,त्याचाच एक भाग म्हणून सप्टेंबर महिन्यात रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी ‘लोकमत’ भेटीप्रसंगी दिली.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावात आयोजित कार्यक्रमासाठी तृप्ती देसाई व भूमाता ब्रिगेडच्या सदस्या जळगावात आल्या आहेत. गुरूवारी दुपारी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीत तृप्ती देसाई यांनी आपल्या आंदोलनांबाबतचे विविध अनुभव कथन केले. त्यांच्याशी झालेल्या गप्पा प्रश्नोत्तर स्वरुपात.
प्रश्न - अनेक महिला मंदिरातील प्रवेशाच्या विषयांवर आपणाशी जुळल्या आहेत. आंदोलनाची भूमिका त्यांना कशा पटवून देता ?
तृप्ती देसाई - शनिशिंगणापूरसह विविध मंदिरात महिलांना प्रवेशाचा विषय आला, त्यावेळी अगोदर खूप विरोध झाला. धर्माशी जुळलेला विषय असल्यामुळे धमक्या आल्या, बदनामी केली गेली. जिच्या उदरातून प्रत्यक्ष देवाने जन्म घेतला तिला मंदिरात जायला विरोध का? मग स्त्री- पुरूष समानता कोठे आहे? कुठलेली काम करताना इच्छाशक्ती प्रबळ असावी हे महिलांना पटवून दिले व त्यांनाही ही ते पटत गेले.
प्रश्न - बरोबर असलेल्यांची मानसिक तयारी कशी करून घेता ?
तृप्ती देसाई : मंदिरात महिला व पुरूष जोडीने जातात. पण दर्शनास केवळ पुरूष मध्ये जातो. हा सन्मान स्त्रीला का नाही? मग मंदिर असो की दर्गा, गुरूद्वारा वा मशिद प्रत्येक ठिकाणी महिलेला समान वागणूक पान १ वरून
मिळावी हे आपण सर्वांना पटवून दिले.
प्रश्न - लोकांचे प्रबोधन आपण करत आहात, त्याला आता प्रतिसाद कसा आहे ?
तृप्ती देसाई - २०१३ पासून मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशासाठी आपण काम करत आहोत. ग्रामीण भागातील नागरिक तर चूल बंद ठेऊ, पण तुमच्या लढ्यात आमच्या घरातील महिलांनाही सहभागी करून घ्या, असे सांगतात. हीच या आंदोलनाच्या यशाची पावती आहे. एक मजबूत संघटन उभे रहात आहे. १२ हजार महिला आज आपल्या बरोबर आहेत.
प्रश्न - भविष्यातील आपल्या आंदोलनाची दिशा काय असेल ?
तृप्ती देसाई - नजीकच्या गुजरात राज्यात दारूबंदी होऊ शकते मग महाराष्टÑात का नाही? मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्यावेळी आपण त्यांना म्हणालो, आपण दारू विक्रीतून महसूल जमा करतात पण तो या राज्यातील महिलांचा तळतळाट आहे. भविष्यात आपण राज्य दारूमुक्तीसाठी आंदोलन करणार आहोत. दारूमुक्ती शिवाय आपण थांबणार नाही.
प्रश्न - मंदिरांच्या संस्थानात मोठ्या प्रमाणात पैसा जमा होतो. एक पर्यायी यंत्रणाच येथे असते, याबाबत काय सांगाल ?
तृप्ती देसाई - खरे आहे, मंदिरांमध्ये करोडोे रूपये जमा होतात. आपण म्हणतो की मंदिरांमध्ये ५० टक्के पुजारी या महिला असाव्यात. महामंडलेश्वर उपाधी महिलांना का मिळत नाही? मंदिरांमधील ट्रस्टींमध्येही ५० टक्के महिला असाव्यात तेथील व्यवहारही चांगले होतील, असा मला विश्वास आहे. तसेच जमा होणारा निधी हा ८० टक्के सरकार जमा होऊन त्यातून दीन, दलित व अडचणीतील शेतकऱ्यांना, शिक्षणापासून वंचित मुलींना मदत मिळावी.
शेकडो महिलांची साखळी
शबरीमाला मंदिर प्रवेशासाठी जेव्हा आंदोलनाचा विषय झाला त्यावेळी केरळात मोठा प्रतिसाद मिळाला. मंदिर प्रवेशासाठीच्या भूमिकेतून तेथील शेकडो महिला एकत्र आल्या व मानवी साखळी तयार करण्यात आली. मात्र तेथील विरोधाची तीव्रता लक्षात घेऊन प्रवेश टाळला. भविष्यात गनिमी काव्याने मंदिरात प्रवेश करूच, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्या समवेत पती प्रशांत देसाई, वासंती दिघे (जळगाव) यांच्यासह माधवी टोम्पे, मीनाक्षी दोंदे, स्वाती वट्टमवार, हिराबाई पवार, राजश्री पाटील, सविता राऊत, माया कांबळे, सागर कचरे, विक्रांत पवार आदी उपस्थित होते.
‘ती’ च्या गणपपतीमुळे मिळाली प्रेरणा
‘लोकमत’ने सुरु केलेल्या ‘ती’ च्या गणपतीमुळे आपल्याला आंदोलनाची प्रेरणा मिळाली. आपल्या आंदोलनास प्रोत्साहनाची गरज होती. नगर येथे ‘लोकमत’ ने ती भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली. परिणामी आंदोलनास प्रतिसाद वाढत गेला. ग्रामीण भागात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठीचे काम ‘लोकमत’ ने केले. यामुळे आंदोलनास पाठिंबा वाढत गेल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: In the coming days, the agitation for drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.