'ऑन-ऑफ'लाइन पध्दतीने बारावीची प्रवेश प्रक्रिया प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:12 AM2021-06-11T04:12:51+5:302021-06-11T04:12:51+5:30
जळगाव : अकरावीचा निकाल जाहीर करून शहरातील काही महाविद्यालयांनी 'ऑन-ऑफ'लाइन पध्दतीने बारावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली आहे. तर काही ...
जळगाव : अकरावीचा निकाल जाहीर करून शहरातील काही महाविद्यालयांनी 'ऑन-ऑफ'लाइन पध्दतीने बारावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली आहे. तर काही महाविद्यालयांमध्ये अजूनही अकरावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका सबमिशनची करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ त्यानंतर निकाल जाहीर होवून पुढील प्रक्रिया राबविण्यात जाईल.
शहरातील महाविद्यालयांनी कोरोनाची स्थिती लक्षात घेता ऑनलाइन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविली. संसर्ग कमी झाला आणि नोव्हेंबर महिन्यात महाविद्यालयांची दारं उघडली. पण, दोन महिन्यानंतर कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे महाविद्यालयांची दारे पुन्हा बंद झाली. कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुध्दा रद्द झाली. तर दुसरीकडे अकरावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने प्रश्न पाठवून ऑफलाइन पध्दतीने उत्तरपत्रिका मागवून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही महाविद्यालयांच्या परीक्षा अजूनही सुरूचं आहेत. तर काही महाविद्यालयांनी ऑनलाइन परीक्षा घेवून त्यांचे ऑफलाइन निकाल सुध्दा जाहीर केले आहे. आता महाविद्यालयांनी बारावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. कोरोनाची स्थिती पाहता, महाविद्यालये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यास तयारी दर्शविली आहे. तर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत देवून ऑफलाइन पध्दतीने काही महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झाली आहे.
रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही
महाविद्यालयांनी ऑनलाइन पध्दतीने बारावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. कर्मचारी सुध्दा नियुक्त केले आहे. विद्यार्थ्यांना अडचणी उद्भवल्यास त्या सोडविण्यासाठी समन्वयक सुध्दा नेमले आहेत. विशेष म्हणजे, महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठीच लिंक उपलब्ध करून दिली जाईल. त्यावर प्रवेश अर्ज भरावयाचा आहे. महाविद्यालयात चलन भरण्यासाठी विद्यार्थ्यांना तासंतास रांगेत उभे राहण्याची आता आवश्यकता नसेल, ऑनलाइन चलन भरण्याची सुविधा देखील महाविद्यालयांकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
काय म्हणाले प्राचार्य...
अकरावीची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली असून तिचा निकाल सुध्दा जाहीर करण्यात आला आहे. बुधवारपासून बारावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात झाली आहे. ही प्रक्रिया ऑफलाइन पध्दतीने राबविली जात आहे. गर्दी होवू नये यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली. या काळात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येवून प्रवेश करून घ्यावयाचे आहे.
- डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय
अकरावीची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका ऑफलाइन पध्दतीने मागवून घेण्यात आल्या आहेत. आता बारावीची प्रवेश प्रक्रिया ही २८ जूनपासून प्रारंभ होणार आहे. ऑनलाइन पध्दतीने ही प्रक्रिया राबविली जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर अॅडमिशनची लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानुसार प्रवेश घ्यावयाचा आहे. चलन सुध्दा ऑनलाइन भरावयाचे आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही.
- प्रा.डॉ.एल.पी.देशमुख, प्राचार्य, नुतन मराठा महाविद्यालय
अकरावीच्या परीक्षेचे प्रश्न ऑनलाइन विद्यार्थिनींना पाठविण्यात आले होते. उत्तरपत्रिका ऑफलाइन पध्दतीने लिहून त्या मागविण्यात आल्या आहेत. दरम्यान, बारावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन किंवा ऑनलाइन हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, दोन्ही पध्दतींना महाविद्यालय तयार आहे.
- गौरी राणे, प्राचार्य, बेंडाळे महिला महाविद्यालय
बारावीची प्रवेश प्रक्रिया लवकरचं सुरू होईल. सध्या अकरावी परीक्षेचे प्रश्न विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने पाठविले होते. या प्रश्नांच्या ऑफलाइन पध्दतीने उत्तरपत्रिका सोडवून मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर निकाल जाहीर होवून बारावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.
- प्रसाद देसाई, समन्वयक, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय