प्रभाग क्रमांक दोनमध्ये विकासकामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:40+5:302021-06-23T04:12:40+5:30
जळगाव : जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या व मनपा फंडातून मंजूर झालेल्या निधीतून शहरातील काही भागांत कामांना सुरुवात झाली ...
जळगाव : जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या व मनपा फंडातून मंजूर झालेल्या निधीतून शहरातील काही भागांत कामांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी प्रभाग क्रमांक दोनमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी स्थानिक नगरसेवकांचीदेखील उपस्थिती होती. या भागात पहिल्यांदाच काँक्रीटचे रस्ते तयार होत असून, पावसाळ्यानंतर इतर कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली.
सातव्या वेतन आयोगाबाबत मनपात बैठक
जळगाव : मनपा कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाबाबतच्या निकषांबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपायुक्त प्रशांत पाटील, संतोष वाहुळे यांच्यासह इतर विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हा आयोग लागू करण्यासाठी मनपाला शासनाने दिलेल्या काही अटी-शर्थींचे पालन करावे लागणार असून, याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच निकष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
स्वीकृत नगरसेवकपदाचा निर्णय होईना
जळगाव : महापालिकेतील शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अजूनही शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. यामध्ये अनेक जण इच्छुक असून, इच्छुकांची असलेली संख्या सेना नेतृत्वाची डोकेदुखी वाढवणारी आहे. आधीच सेनेत अनेक जण नाराज असल्याने स्वीकृत नगरसेवकाची निवड करून ही नाराजी वाढण्याची शक्यता असल्याने सेनेकडून स्वीकृत नगरसेवकाच्या नावाची घोषणा टाळली जात असल्याचे दिसून येत आहे.
आव्हाणे येथे १०० जणांना लसीकरण
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे मंगळवारी लसीकरणाचा कॅम्प लावण्यात आला होता. फुपनगरी उपकेंद्राकडून या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी गावातील १०० जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून, बुधवारीदेखील या ठिकाणी लसीकरण कॅम्प सुरू राहणार आहे.