सुधारीत आराखड्याच्या मंजुरीनंतर पिंप्राळा उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:25 PM2020-08-10T12:25:04+5:302020-08-10T12:25:15+5:30
दिपक बोंडे : ...तर विद्युत खांब हटविल्यानंतर असोदा उड्डाणपुलाचे काम सुरू होणार
जळगाव : पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलासाठीचा सुधारित आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतरच या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती ‘महारेल’ चे कार्यकारी अभियंता दीपक बोंडे यांनी ‘लोकमत’ला दिली. दुसरीकडे विद्युत खांब हटविल्यानंतर असोदा उड्डाणपुलाच्या कामालाही सुरूवात होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी आगामी दोन वर्षांत सर्व ठिकाणचे रेल्वे गेट बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपुल किंवा भुयारी मार्ग उभारण्याचे जाहीर केले आहे. भुसावळ विभागामध्ये १०० ठिकाणी रेल्वे गेट आहेत.
टप्प्याटप्प्याने या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत. यामध्ये जळगाव शहरात पिंप्राळा उड्डाणपुल व असोदा उड्डाणपुलाचा समावेश आहे. या ठिकाणी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (महारेल)तर्फे उड्डाणपुल बांधण्यात येत आहेत. या दोन्हींही ठिकाणी उड्डाणपुलाच्या कामासाठी ‘महारेल’तर्फे गती देण्यात आली असून, दोन्ही ठिकाणच्या कामाच्या निविदा प्रक्रियाही पुर्ण झाल्या असल्याचे सांगण्यात आले.
मनपाने या ठिकाणी ‘आर्म’ उभारण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर उड्डाणपुलाचा नवीन सुधारीत आराखडा पाठविला आहे. विशेष म्हणजे या नवीन आराखड्यावरच पुलासाठी नेमके कुठल्या भागातील अतिक्रमण अडथळा ठरणार आहे, हे स्पष्ट होणार आहे.
मनपातर्फे भुयारी मार्गाऐवजी ‘आर्म’ चा प्रस्ताव
पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुल भोईटेनगर व सुरत रेल्वेलाईन ओलांडून शिवाजीनगर भागात तसेच भोईटेनगरच्या पुढे भिकमचंद जैन नगरजवळ उतरणार आहे. यामुळे भोईटेनगरचा परिसर व रिंगरोडचा काही परिसर या उड्डाणपुलाच्या खाली येणार आहे. त्यामुळे रहिवाशांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये, याकरिता महारेलतर्फे मनपाला आर्म किंवा भुयारी बोगदा तयार करून देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. यावर महापालिकेने भुयारी मार्गाऐवजी ‘आर्म’ तयार करून देण्याचा प्रस्ताव ‘महारेल’कडे पाठविला आहे.