ऐन पावसाळ्यात मनपाकडून रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:56 AM2020-06-11T11:56:37+5:302020-06-11T11:56:52+5:30

लॉकडाऊनमध्ये परवानगी असतानाही कामे ठप्प : जेव्हा कामे करायची होती तेव्हा दुर्लक्ष

Commencement of road repair works by NCP in Ain monsoon | ऐन पावसाळ्यात मनपाकडून रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ

ऐन पावसाळ्यात मनपाकडून रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्रारंभ

Next

जळगाव : पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची समस्या निर्माण झाल्यानंतर आता ऐन पावसाळ्यात मनपा प्रशासनाकडून शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात शासनाने रस्ते दुरुस्तीसह इतर कामांना परवानगी दिली असतानाही त्यावेळी रस्ते दरुस्तीच्या कामाला सुरुवात न करता ऐन पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याने तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार सध्या मनपा प्रशासनाकडून होत आहे.
शहरातील रस्त्यांची समस्या ही गेल्या दोन-तीन वर्षांपासून जळगावकरांना सहन करावी लागत आहे. गेल्यावर्षी रस्त्यांची समस्या अत्यंत बिकट झाल्यानंतर यावर्षी तरी ही समस्या मार्गी लागेल, अशी शक्यता होती. मात्र, मनपाचे ढिसाळ नियोजन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे शहरातील रस्त्यांची समस्या यावर्षी देखील मार्गी लागलेली नाही. रस्त्यांची दुरुस्ती ही नेहमी पावसाळ्याचा आधी केली जात असते. मात्र, लॉकडाऊनचे कारण पुढे करत महापालिका रस्ते दुरुस्तीच्या कामापासून पळ काढत आहे. विशेष म्हणजे पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर राज्य शासनाने रस्त्यांचा कामांसह इतर विकासाच्या कामांना सुरुवात करण्याची परवानगी दिली होती. मात्र, एप्रिल व मे महिन्यात मनपा प्रशासन झोपा झोडत होते का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

पहिल्याच पावसात दाणादाण उडाल्यानंतर आली जाग
शहरातील रस्त्यांची समस्या ही दरवर्षाची आहे. मात्र, मनपाने याबाबत गांभिर्याने घेतले नाही. आता जून महिन्याचा पहिल्याच आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मनपाचे पितळ उघडे पडल्यानंतर मनपाला जाग आली आहे. दरम्यान, आगामी दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पाऊस झाल्यास मनपाने केलेल्या रस्त्यांची पुन्हा दुरावस्था होईल. त्यामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीवर करण्यात आलेला खर्च वायाच जाण्याची भीती आहे. महापालिकेने जर समस्या मार्गी लावायचीच होती तर लॉकडाऊनच्या काळात कामांना सुरुवात करण्याची गरज होती असे मत शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केले.

लॉकडाऊनच्या काळात मजुरांची समस्या असल्याने कामांना उशीर झाला असला तरी, काही भागात रस्ते दुरुस्तीचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. जितकी समस्या कमी होईल तितकी समस्या कमी करण्याचा प्रयत्न आहे.
-भारती सोनवणे, महापौर

महापालिकेची स्थिती सध्या ‘अंधेरनगरी चौपट राजा’ अशी झाली आहे. डांबरने दुरुस्त केलेले रस्ते पावसाळ्यात टिकत नाही, अशा परिस्थितीत ऐन पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करणे म्हणजे मनपाच्या तिजोरी मुद्दामहून खाली करण्याचा प्रकार आहे. जर दुरुस्ती करायचीच होती तर एप्रिल व मे महिन्यात का केली नाही?
-सुनील महाजन, मनपा विरोधी पक्षनेते

Web Title: Commencement of road repair works by NCP in Ain monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.