साहित्य क्षेत्रास प्रोत्साहन देण्यात शासन व जनता उदासीन - एकनाथराव खडसे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:35 PM2018-12-02T12:35:55+5:302018-12-02T12:36:24+5:30
ओबीसी साहित्य संमेलन उत्साहात
जळगाव : वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी साहित्य व साहित्यिकांना प्रोत्साहनाची आवश्यकता असताना दुर्दैवाने शासन व जनता हे दोन्ही घटक याप्रश्नी उदासीन आहेत अशी टीका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी येथे आयोजित पहिल्या ओबीसी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना केली.
ओबीसी फाउंडेशन आॅफ इंडिया आयोजित पहिल्या राज्यस्तरीय ओबीसी साहित्य संमेलनाचे शहरातील कांताई सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर संमेलनाध्यक्षा डॉ. महालक्ष्मी मोराळे, महापौर सिमा भोळे, साहित्यिक प्रभाकर श्रावण चौधरी, दिवाकर चौधरी, आत्माराम माळी, स्वाती मोराळे, उद्योजक चंद्रकांत बेंडाळे, रत्नाकर मोराळे, तुषार वाघुळदे आदी होते. संमेलनाची सुरूवात सकाळी ८.३० वाजता ग्रंथ दिंडीने झाली.
बस स्थानकाजवळील चिमुकले राममंदिरापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. दिंडीतील ग्रंथराज ज्ञानेश्वरीसह २० ग्रंथांचे पूजन झाले. मेहरूण मधील श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनींचे लेझीम पथक दिंडीत सहभागी झाले होते. सभागृहात खडसे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन झाले.
मान्यवरांचा सत्कार
साहित्य क्षेत्रात योगदान असलेल्या सतीश कुबेर (धुळे), डॉ. किसन पाटील, डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी, प्रा. लतिका चौधरी (दोंडाईचा), डॉ. सतीश कराडे (नागपूर), गोकुळ बागुल, डॉ. प्रमोद महाजन, पांडुरंग सुतार, अभिनेत्री प्रियंका टोके (मुक्ताईनगर), डॉ. नितीन पाटील, प्रा. रमेश राठोड, प्रा. देवबा पाटील, डॉ.अभिजीत कवटकर आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
विविध सत्र उत्साहात
ओबीसी समाजाच्या प्रगतीत साहित्यिकांचे योगदान या विषयावर यावेळी परिसंवाद झाला यानंतर कथाकथन, गझल मुशायरा व कवीसंमेलनही यावेळी झाले. विविध सत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन रत्नाकर मोराळे व तुषार वाघुळदे यांनी केले.
मक्तेदारी संपली
एकनाथराव खडसे म्हणाले, राज्यात ५२ टक्के ओबीसी समाज आहे. ३४३ जाती-जमातींचा त्यात समावेश आहे. कला, संस्कृती साहित्य या क्षेत्रात एकेकाळी एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती. मात्र कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे काव्य अजरामर झाले, समाजाला एक दिशा देण्याचे काम या काव्याने केले. ओबीसी समाजातीलही अनेक व्यक्ती चांगले लिखाण करतात. या लिखाणाला लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न हे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होतात. मात्र साहित्य क्षेत्रावर आज सोशल मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या प्रभावामुळे मोठे परिणाम झाले आहे. साहित्यिकांच्या लिखाणाला प्रोत्साहन मिळावे, प्रतिसाद मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. दुर्दैवाने शासन, जनता नेमकी याबाबत उदासीन असल्याबद्दलची नाराजी खडसे यांनी व्यक्त केली. आज दलित, विद्रोही विविध भाषिकांचे साहित्य संमेलन होते त्यामागे केवळ एकच हेतू असतो की साहित्यिकाचे साहित्य हे जनतेसमोर यावे त्यातून जागृती व्हावी.
साहित्य समाजाचा हुंकार
साहित्य हे समाजातून येत असते. समुहाचा हुंकार घेऊन समाजाचे जगणे बनते. तर कधी ज्ञानदेवासारखे विश्वाला शांतीचे मागणे मागते. साहित्य ही कुणाची मक्तेदारी नसते अनुभवातून साहित्याची निर्मिती होत असते, असे प्रतिपादन स्वागताध्यक्षा डॉ. महालक्ष्मी मोराळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. ओबीसी समाजाने सामाजिक, शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या ओबीसींना आपल्या मानसिकतेत बदल करून घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या संमेलनातून आपण साहित्य संस्कृती समृद्ध करत आहोत. आपल्या ज्ञाती बांधवांना सहकार्य करत आहोत, असेही त्या म्हणाल्या.