सप्ताहातील चारच दिवस सुरू राहणार जळगावातील व्यापारी संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 12:33 PM2020-08-04T12:33:02+5:302020-08-04T12:36:23+5:30
मंगळवार, गुरुवार, शनिवार पूर्ण बंद
जळगाव : गेल्या साडेचार महिन्यांपासून बंद असलेले व्यापारी संकूल सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला खरा, मात्र हे संकूल सप्ताहातील मंगळवार, गुरुवार, शनिवार पूर्ण बंद ठेवत केवळ उर्वरित चारच दिवस सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणावरून असा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी यामुळे व्यापारी वर्ग समाधानी नसून सर्वच मार्केटच्या पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. व्यापाऱ्यांची भूमिका स्वाभाविक आहे, मात्र त्यांच्याच सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बैठकीत झालेल्या निर्णयाचे अधिकृत आदेश मंगळवार, ४ आॅगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. तसेच १५ आॅगस्टपर्यंत बैठकीतील निर्णयानुसार दुकाने उघडण्यास मुभा राहणार असून सर्व सुरळीत राहिल्यास पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या साडेचार महिन्यांपासून शहरातील व्यापारी संकूल बंद आहेत. हे संकूल सुरू करण्याबाबत शनिवार, १ आॅगस्ट रोजी निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र हे संकूल सुरू करीत असताना त्या विषयी सूक्ष्म नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी संघटनेची बैठक आयोजित करुन धोरण, नियमावली निश्चित करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार सोमवार, ३ आॅगस्ट रोजी मनपाच्या दुसºया मजल्यावरील सभागृहात व्यापारी संकुलातील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापौर भारती सोनवणे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते.
व्यापारी संघटनांकडून मागविल्या सूचना
सर्व व्यापारी संकुलांना एकच नियमावली लागू राहणार असून सम, विषम पध्दतीने दुकाने उघडण्यात येतील, सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकान उघडे ठेवता येतील, व्यापारी संकुलातील दुकाने त्या-त्या दुकान क्रमांक सम, विषम पद्धतीने विभागून उघडता येतील असे काही पर्याय प्रशासनातर्फे व्यापाºयांसमोर ठेवण्यात आले. त्यावर व्यापारी संघटनांच्या पदाधिकाºयांकडून त्यावर सूचना मागविण्यात आल्या.
सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने उघडी ठेवा
बैठकीमध्ये व्यापाºयांनी सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने उघडी ठेवून केवळ शनिवार, रविवार पूर्णत: बंद ठेवावी तसेच दाणाबाजार आणि भाजीपाला विक्रीदेखील बंद ठेवावी, अशा सूचना मांडल्या. तसेच नकळत व्यापाºयांकडून काही चूक झाल्यास दुकानाला सील न लावता जागेवरच दंडात्मक कारवाई करावी, दुकानात ५ व्यक्ती किंवा ५ ग्राहक संकल्पना स्पष्ट करावी, हॉकर्सवर कारवाई करावी, व्यापारी संकुलांना लावलेले पत्रे उघडावे, संपूर्ण मार्केट एक दिवस उघडावे, एक दिवस बंद ठेवावे, दुकानांची वेळ कमी करा मात्र सर्व एकाच वेळी उघडण्यास परवानगी द्या अशा सूचना मांडल्या.
तीन दिवस राहणार बंद
सम-विषम पद्धतीने गर्दी वाढून तसेच ग्राहकांना वारंवार बाजारपेठेत यावे लागू शकते, असेही काही व्यापारी संघटनांचे म्हणणे असल्याने व सलग दुकाने सुरू ठेवता येणेही शक्य नसल्याने अखेर सप्ताहातील मंगळवार, गुरुवार, शनिवार व्यापारी संकूल पूर्णपणे बंद ठेवून इतर दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज निघणार आदेश, १५नंतर पुढील निर्णय
बैठकीत झालेल्या निर्णयाचे अधिकृत आदेश मंगळवार, ४ आॅगस्ट काढण्यात येणार असून प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, १५ आॅगस्टपर्यंत बैठकीतील निर्णयानुसार दुकाने उघडण्यास मुभा राहणार असून सर्व सुरळीत राहिल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मनपा आयुक्त कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
व्यापारी समाधानी नाही
व्यापारी संकूल अखेर सुरू होण्याचा निर्णय झाला, याचा आनंद आहे, मात्र यात महिन्यातील निम्मे दिवस तर दुकाने बंद राहू शकतात. त्यामुळे साडेचार महिन्यांपासून हवालदिल झालेल्या व्यापारी वर्गापुढे पुन्हा चिंता राहणारच असल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. यात निम्म्या दिवसात व्यवसाय कसा पूर्ववत येऊ शकले, कर्मचारी व इतरांना महिन्याचा पगार द्यावा लागेल अथवा त्यांना कमी केले किंवा वेतन कमी केले तरी त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे अनेक प्रश्न व्यापारी वर्गातून उपस्थित केले जात असून समाधानी नसल्याचेही व्यापाºयांचे म्हणणे आहे.
सर्वच संकूल एकाच दिवशी सुरू राहणार
शहरातील २० पेक्षा कमी दुकाने असलेल्या संकुलांमधील दुकाने उघडण्यास सम-विषम पद्धतीने यापूर्वीच परवानगी देण्यात आली आहे. आता सोमवारी झालेल्या निर्णयानुसार महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट, जुने व नवे बी.जे. मार्केट, जिल्हा क्रीडा संकूल, शाहू महाराज कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट इत्यादी सर्व मोठे व्यापारी संकूल एकाच दिवशी सुरू राहणार आहेत.
नियमांचे पालन करा
व्यापाºयांची अडचण आम्हाला समजते मात्र स्वत:ची आणि शहराची काळजी घेणे आपल्याच हातात आहे. व्यापाºयांकडून सहकार्याची अपेक्षा असून दुकानात सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, मास्कचा उपयोग करावा, गर्दी टाळावी, जो व्यक्ती मास्क आणि नियमांचे पालन करणार नाही त्याला साहित्य देऊ नये, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले.
पालकमंत्र्यांची घेणार भेट
शहरातील व्यापारी संकूल सुरू करण्यासंदर्भात घोषणा करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही संकूल दररोज सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे. मात्र या संदर्भात नियमावली ठरविताना सप्ताहातील तीन दिवस संकूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या संदर्भात पालकमंत्री पाटील यांची मंगळवार, ४ आॅगस्ट रोजी भेट घेणार असल्याचे सेंट्रल फुले मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतानी यांनी सांगितले.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार टप्प्या-टप्प्याने दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येत आहे. व्यापारी संकुलाबाबत व्यापाºयांची भूमिका स्वाभाविक असली तरी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काम करणे गरेजेचे आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येत आहे. गर्दी नियंत्रित न झाल्यास १५ आॅगस्टनंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.
कोरोना उपाययोजना व व्यवसाय सुरू होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीतच आहे. मात्र अनेक दिवसांपासून व्यापारी संकूल बंद असल्याने येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. सम-विषम पद्धत अडचणी ठरू शकत होती. आता सर्व दुकाने दररोज सुरू करण्यास काही अडचण नाही.
- शांताराम सोनवणे, अध्यक्ष, गाळेधारक संघटना.
अनेक दिवसांपासून व्यापार ठप्प असल्याने नाईलाजास्तव हा निर्णय मान्य करावा लागत आहे. यातून व्यापारी समाधानी नाही. या संदर्भात पालकमंत्र्यांची भेट घेणार आहे.
- रमेश मतानी, अध्यक्ष, सेंट्रल फुले मार्केट व्यापारी असोसिएशन.
राज्यात इतरत्र दररोज व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळत आहे, मग जळगावातच का नाही? व्यापाºयांना अजून किती दिवस वेठीस धरले जाईल. व्यापारी संकूल दररोज सुरू करण्यास काही हरकत नाही.
- पुरुषोत्तम टावरी, कोषाध्यक्ष, गोलाणी मार्केट व्यापारी असोसिएशन.
वेळ कमी करा, मात्र दररोज दुकाने सुरू ठेवणे आवश्यक आहे. एक दिवसआड दुकाने उघडल्यास उलट गर्दी होण्याची भीती आहे. त्यामुळे दररोज दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी.
- पंकज मोमाया, अध्यक्ष, महात्मा गांधी मार्केट व्यापारी असोसिएशन.