पार्किंगचा व्यावसायिक वापर; पाच दुकाने सील, मनपा आयुक्तांची कारवाई
By सुनील पाटील | Published: January 4, 2024 06:06 PM2024-01-04T18:06:18+5:302024-01-04T18:09:04+5:30
अधिकाऱ्यांचे मोबाईल घेतले ताब्यात
सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: पार्किंगच्या जागेत व्यावसायिक वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे मुख्य रस्त्यावरील पाच दुकाने महानगरपालिकेने गुरुवारी दुपारी सील केले. कारवाईत बाधा तसेच हस्तक्षेप होऊ नये यासाठी कारवाईपूर्वी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी पथकातील पाचही अधिकाऱ्यांचे मोबाईल ताब्यात घेतले होते. बेसमेंटचा वापर पार्कींगसाठी न करता व्यवसायासाठी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सातत्याने तक्रारी होत होत्या, त्याच मुहूर्त अखेर गुरुवारी लाभला. दरम्यान, या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मुख्य रस्त्यावरील व्यावसायिकांनी पार्कींच्या जागेत दुकान, गोदाम सुरु केल्यामुळे ग्राहकांना भर रस्त्यावर वाहने लावावी लागत आहेत. कधी वाहतूक शाखेकडून वाहनांवर दंडात्मक कारवाई होते तर कधी वाहनच टोईंग करुन नेले जात होते, त्याशिवाय वाहतूक कोंडी नित्याचीच होती. पार्किंगची जागा बळकावलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करावी म्हणून माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी गेल्या पंधरवाड्यात आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्याकडे तक्रार केली होती. त्याशिवाय सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनीही आयुक्तांच्या दालनासमोर केक कापला होता. पार्किंग आणि वाहतूक कोंडी यामुळे सामान्य जळगावकरही वैतागला होता.
या दुकानांवर केली कारवाई
- दुकान - मालक
- शितल कलेक्शन : निलेश नाथांनी
- दीपक शूज : अजय ठाकूरदास ललवाणी
- टायझर : रेखा रमेश वाणी
- कोंब : विमल जोशी
- सेलिब्रेशन : रितेश कौरानी
पार्कींग आणि गोदाम असे दोन प्रकार यात आहेत. पहिल्या टप्प्यात पार्किंगचा व्यवसायिक वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. प्रत्येक रोडनिहाय अशा दुकानांची माहिती काढली जात आहे. नियमांचे उल्लघंन करणाऱ्या सर्वच दुकानांवर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार आहे. आज कारवाई केलेल्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या, शिवाय सुनावणीही झालेली होती. सील केलेल्या दुकान मालकांनी पार्किंग सिद्ध करून दाखवावी, सुरक्षा रक्षक ठेवावा. तेव्हाच सील उघडू.
- डॉ.विद्या गायकवाड, आयुक्त, महानगरपालिका