मानधन मागणाऱ्या भाजपा नगरसेवकांना आयुक्तांनी खडसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:37 PM2019-01-05T12:37:33+5:302019-01-05T12:37:51+5:30
गाळे कारवाई करु द्या, मानधन देतो: आयुक्तांची भूमिका
जळगाव : मनपाकडे काही महिन्यांपासूनचे थकीत मानधन मिळावे, यासाठी सत्ताधारी भाजपाच्या काही नगरसेवकांनी मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे अक्षरश गयावया करत असल्याचे शुक्रवारी दिसून आले. थकीत मानधनाची मागणी करणाºया नगरसेवकाची मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना मानधन दिले जावू शकत नसल्याचे कारण देत आयुक्तांनी संबधित नगरसेवकांचे मानधन नाकारले. तसेच मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळ्यांवर कारवाई करू द्या मानधन देतो असेही आयुक्तांनी या नगरसेवकांना सुनावले.
मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी शासनाकडून मिळणारे मानधन नाकारले आहे. विद्यमान नगरसेवकांमध्ये अनेक नगरसेवक आहेत की ज्यांनी तब्बल १० वर्षांपासूनचे मानधन मनपाकडून घेतलेले नाही. अशा परिस्थिती पाच महिन्यांपुर्वी निवडून आलेल्या भाजपाच्या काही नगरसेवकांनी आयुक्तांकडे थकीत चार महिन्यांचे मानधन मिळावे अशी मागणी केल्यामुळे आयुक्त संबधित नगरसेवकाला चांगलेच खवळलेले पहायला मिळाले. मानधन हे जरी नगरसेवकांचा अधिकार असला तरी मनपाची आर्थिक परिस्थिीतीचा विचार नगरसेवकांनी करणे गरजेचे आहे. मनपा कर्मचाºयांना दोन-दोन महिन्यांचे वेतन मिळत नाही. काही कर्मचाºयांना अनेक वर्षांपासूनची पेन्शनची रक्कम देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत नगरसेवकांनी आपली मानधनाची रक्कम सध्या तरी काढू नये अशी अपेक्षा प्रशासनाला किंवा नागरिकांना आहे.
गाळे कारवाई करु द्या, मानधन देतो- आयुक्तांची भूमिका
संबधित नगरसेवकांना आयुक्तांनी धारेवर धरत, एकीकडे तुमचा पक्ष गाळे कारवाई करू देत नाही. त्यामुळे मनपाला सुमारे १५० कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळत नाहीय. अशा परिस्थितीत थकीत मानधन देणे शक्य नसल्याचे आयुक्तांनी नगरसेवकांना सांगितले. गाळे कारवाई करु द्या, तुमचे मानधन देतो अशी भूमिका आयुक्तांनी नगरसेवकांसमोर मांडली. आयुक्तांनी या शब्दात खडसावल्यानंतर या नगरसेवकांनी दालनातून काढता पाय घेतला.
आयुक्तांवर गाळे कारवाईसाठी खरोखरच दबाव
मनपा आयुक्तांनी भाजपा नगरसेवकांना मानधनाच्या मुद्यावरून खडसावताना तुमची पार्टी गाळे कारवाई करु देत नसल्याचे सांगितल्यामुळे भाजपाकडून आयुक्तांवर गाळे कारवाई न करु देण्याबाबत दबाव आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या महिन्यात आयुक्तांनी गाळेधारकांना थकीत गाळे भाडे भरण्याचा सूचना केल्या होत्या. तसेच भाडे न भरल्यास कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, गाळेधारकांनी आयुक्तांच्या सूचना धुडकावून लावत थकीत रक्कम भरली नाही.आयुक्तांच्या सूचना धुडकावणाºया गाळेधारकांना मोठ्या प्रमाणात राजकीय पाठबळ असल्यामुळेच गाळेधारक आयुक्तांच्या आदेशाला गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येत आहे.