बोगस डॉक्टरांचा शोध घेणाऱ्या समित्या कागदावरच, तक्रारीशिवाय कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:33 AM2021-09-02T04:33:14+5:302021-09-02T04:33:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड काळात अन्य बाबींकडे आरेाग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा प्रत्यय समोर येत आहे. त्यातच बोगस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड काळात अन्य बाबींकडे आरेाग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा प्रत्यय समोर येत आहे. त्यातच बोगस डॉक्टरांच्या शोध घेणाऱ्या समित्या या वर्षभरात केवळ कागदावरच काम करीत असून बोगस डॉक्टरांच्या तक्रारींवर अद्यापही कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. गेल्या वर्षभरात ७ ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शिवाय तक्रारीशिवाय कुणावरही या समित्यांकडून कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील रुग्णालयांची बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार जिल्हा आरेाग्य अधिकाऱ्यांकडे, नगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांची जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तर त जळगाव शहरातील रुग्णालयांची नोंदणी ही महापालिकेकडे होत असते. नोंदणी न केलेल्या रुग्णालयांना अनधिकृत ठरविण्यात येत असते. कोविडच्या काळात आरोग्य यंत्रणेवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले, मात्र, बोगस डॉक्टरांच्या विषयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
कुठून किती तक्रारी
भडगाव : २
पाचोरा : १
जामनेर २
चोपडा १
चाळीसगाव १
१० तालुक्यात एकही तक्रार नाही
जिल्ह्यातील १० तालुक्यांमधून गेल्या वर्ष दोन वर्षात एकाही बोगस डॉक्टरांची तक्रार समोर आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केवळ ७ तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत चौकशी करण्याचे आदेश समितीला देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तक्रार आल्यानंतर याबाबत चौकशी केली जाते असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
समितीत कोणाचा समावेश
बोगस डॉक्टरांवर कारवाई संदर्भात चौकशी करण्यासाठी असलेल्या समितीत त्या त्या तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांचा तसेच तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असतो. मात्र, तक्रारीशिवाय ही समिती चौकशी करीत नाही व चौकशी झाल्यानंतर त्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जातो.
शहरातील नोंदणीकृत रुग्णालये ४०२
जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांच्या तक्रारी ०७
बोगस डॉक्टरांबाबत तक्रार आल्यानंतर समितीला याबाबत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात येतात. समिती त्यानुसार चौकशी करून अहवाल सादर करीत असते. त्यानंतर कारवाई केली जाते. - डॉ. बी. टी. जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी