सामान्य रुग्णालय कधी होणार सामान्यांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 07:05 PM2018-09-22T19:05:50+5:302018-09-22T19:06:04+5:30
विजयकुमार सैतवाल
जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वारंवार येणाºया समस्यांचा अनुभव आता नित्याचा झाला असून सामान्य रुग्णालय कधी सामान्यांचे होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
येथे प्रसूतीसाठी येणाºया महिलांना येथे उपचार उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांना इतरत्र हलविणे, खाजगी रुग्णालयात पाठविणे, अरेरावीची भाषा करणे असे अनुभव येथे नेहमी येत असतात. आता पुन्हा दोन दिवसांपूर्वी असाच अनुभव जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील महिलेला आला.
नंदगाव येथील सुखाबाई मालचे या महिलेला जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी या महिलेची प्रसूती झाली. सिझेरियन झाल्याने या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री एका परिचारिकेने पलंगावरून खाली उतरण्यास सांगितले. मात्र प्रसूती होऊन तीनच दिवस झालेले असताना व नवजात बाळही शिशू कक्षात असताना तेथून कसे जाणार असा प्रश्न महिलेला पडला. तरीदेखील परिचारिकेने या महिलेकडे तगादा सुरूच ठेवला. अखेर बुधवारी रात्री बारा वाजता दुसºया महिलेला पलंगावर टाकायचे असल्याने तू पलंगाच्या खाली उतरली तर ठिक नाही फेकून देऊ अशी धमकीच दिली व कक्षातून बाहेर काढून दिले.
त्यामुळे कक्षातून बाहेर काढून दिल्याने नाईलाज म्हणून ही महिला जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनानजीक असलेल्या व्हरांड्यात खालीच झोपली. सोबत असलेली नातेवाईक महिलाच या प्रसूत महिलेजवळ थांबून होती. रात्री १२ ते सकाळी ११ असे तब्बल ११ तास या सिझेरियन झालेल्या महिलेला उघड्यावर काढावे लागले. त्यामुळे पुन्हा जिल्हा रुग्णालयातील कर्मचाºयांच्या वागणुकीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जागा वाढवून प्रश्न मार्गी लावा
जिल्हा रुग्णालयात १०० खाटांचा प्रसूती कक्ष आहे. दररोज या ठिकाणी २० ते २५ प्रसूती होतात. त्यात सिझेरियन झाल्यानंतर महिलांना चार ते पाच दिवस उपचारासाठी रुग्णालयातच ठेवावे लागते. त्यामुळे जागेचा मोठा प्रश्न निर्माण होऊन बºयाच वेळा एका पलंगावर दोन रुग्णांना टाकावे लागते. आता वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने रुग्णांचा ओघ वाढला असून रुग्णालयातून प्रसूतीनंतर जाणाºया महिलांची संख्या कमी व येणाºया महिलांची संख्या जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नेहमीच अशा समस्या उद््भवत आहे. त्यामुळे येथे खाटा वाढवून सामान्यांना पुरेसे उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.