चोपड्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 05:12 PM2019-06-07T17:12:17+5:302019-06-07T17:13:37+5:30
दुर्लक्ष : शासनाच्या निर्णयला केराची टोपली
चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयातर्फे प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असताना चोपडा शहरात आणि तालुक्यात प्लास्टिकचा बेसुमार वापर सुरू आहे. याकडे मात्र पालिकेने व इतर संबंधितांनी दुर्लक्ष करत शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवलेली आहे.
बाजारात सर्रासपणे प्लास्टिकच्या पिशव्या या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर अनेक व्यावसायिक वापरत असताना पाहूनही न पाहिल्यासारखे करीत त्यांच्यावर ते निर्बंध आणत नाहीत. यामुळे शहरात प्लॅस्टीकच्या कचºयात रोजच मोठी भर पडत आहे.
प्लास्टिकच्या अशा बेसुमार वापराने होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतलेला आहे. ३० सप्टेबर अखेर छोट्या व्यावसायिक व मोठे व्यावसायिकांकडे उपस्थित असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा उपयोग करून एक आॅक्टोबर नंतर या प्लास्टिक बंदीच्या आदेशाची कडक अंमलबजावणी महाराष्ट्रात होत असतांना चोपडा शहरात मात्र सर्रास ग्राहकांना छोट्या आणि मोठ्या व्यावसायिकांकडून प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या जात आहेत .प्लास्टिक वापरावर निर्बंध आणण्यासाठी नगरपालिकेतील कर्मचारी सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे जागरूक नागरिकांमधून भावना व्यक्त होत आहेत. शहरातील प्लास्टिक पिशव्या विकणारे होलसेलर (ठोक विक्रेते)आणि छोटे व्यावसायिक े मात्र पालिकेचे मुख्याधिकारी व संबंधित कर्मचारी यांना दिसत नाही का? नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांची मानसिकता प्लास्टिक बंदीची नसल्याने शहरात आणि ग्रामीण भागातील मोठ्या खेड्यांवरही सर्रासपणे दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्या वापरत आहेत.
यंदाच्या वर्षात एकही कारवाई नाही
१ जानेवारी नंतर चोपडा पालिकेकडून प्लास्टीक पिशव्या वापरणाºया एकही कारवाई झालेली दिसत नाही. अथवा यासाठी कर्मचाऱ्यांचे पथक कार्यान्वीत दिसत नाहीत. यावरून प्लास्टिक बंदीबाबत उदासीनता दिसत आहे.