तक्रारदार महिलेला निरीक्षणाखाली ठेवणार; आशादीप वसतिगृह प्रकरणी निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 05:49 AM2021-03-05T05:49:41+5:302021-03-05T05:52:41+5:30
या प्रकरणात आतापर्यंत ४३ जणांचे जबाब घेण्यात आले. यात या वसतिगृहात स्वच्छता आणि मुलींच्या जेवणाची आबाळ होत आहे, गर्भवती महिलांना देखील सकस जेवण मिळत नाही, या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत, तसेच ही इमारत खासगी जागेत आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आल्याची माहिती मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आशादीप वसतिगृहातील त्या कथित प्रकरणातील तक्रारदार तरुणीची मानसिक स्थिती चांगली नसल्याने तिला तीन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, हे वसतिगृह शासकीय जागेवर हलविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणात आतापर्यंत ४३ जणांचे जबाब घेण्यात आले. यात या वसतिगृहात स्वच्छता आणि मुलींच्या जेवणाची आबाळ होत आहे, गर्भवती महिलांना देखील सकस जेवण मिळत नाही, या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत, तसेच ही इमारत खासगी जागेत आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आल्याची माहिती मिळाली. रहिवाशांचा विरोध लक्षात घेता शासकीय इमारतीत हे वसतिगृह हलविण्यासंदर्भात लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.
या वसतिगृहातील एका महिलेने आपणास कपडे उतरवून नृत्य करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता. या प्रकाराची चौकशी रात्री उशिरापर्यंत आशादीप वसतिगृहात आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात सुरू होती. त्यावेळी या प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, आशादीप वसतिगृह व महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याबाबत महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणी बेजबाबदार विधाने करुन जळगावची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला.
तक्रारदार संघटनेने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
या प्रकरणाची तक्रार करणारे जननायक फांउडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी व सहकाऱ्यांनी गुरुवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रम कथन केला. बुधवारी गुप्तचर यंत्रणा, सीआयडी तसेच चौकशी समितीनेही जबाब नोंदविले.