विद्यापीठाविषयी केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:05 PM2020-02-10T12:05:58+5:302020-02-10T12:06:06+5:30
खुलाशानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक : उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविली प्राप्त तक्रार
जळगाव : विद्यापीठाच्या भोंगळ कारभारासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व फार्मसी स्टूडंट कौन्सिल संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती़ या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेण्यात आली असून ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहे़ त्याबाबतचे पत्र दोन्ही संघटनांना रविवारी प्राप्त झाले आहे.
कवयित्री बहिणाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भोंगळ कारभारा विरोधात काही महिन्यांपासून जिल्ह्यातील विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत़ संघटनांकडून विद्यापीठ प्रशासनावर अनेक आरोप झालीत़ त्या आरोपांना फेटाळून लावण्यासाठी विद्यापीठाकडून नुकताच खुलासा करण्यात आला होता़ मात्र, हा खुलासा विद्यार्थी संघटनांनी अमान्य करून सर्व प्रकारांबाबत विद्यापीठाने पुरावे सादर करत संघटनांना चर्चेसाठी बोलवावे, असे आवाहन केले आहे तर काही संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरूध्द विद्यापीठ प्रशासनाला व संघशक्तीला विद्यापीठाबाहेर काढून विद्यापीठ बंद करून आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा दिला आहे.
मग़़़व्यवहारे यांनी कुणाच्या जाचाला कंटाळून राजीनामा दिला
विद्यापीठाने खुलासा दिल्यानंतर शहरातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यापीठाला पुरावे सादर करण्याचे मागणी केली आहे. यात त्यांनी विद्यापीठाच्या टीए, डीए संदर्भात असलेले विद्यापीठाचे व महाराष्ट्र शासनाचे नियम वेगवेगळे असतील तर जाहीर करावेत. तसेच मागील कुलसचिव बी.बी. पाटील यांच्या राजीनाम्यासंदर्भात असलेले रेकॉर्ड श्वेत पत्रिकेच्या रूपाने जाहीर करावे, नवीन कुलसचिव नियुक्त करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी, वित्त लेखा अधिकारी हे एका संस्थेतून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या ऐवजी विद्यापीठ परिक्षेत्रात एकही लायक अधिकारी किंवा प्राध्यापक का मिळू शकला नाही का? यासोबतच निवृत्त न्यायाधीश व्यवहारे यांनी कोणाच्या जाचाला कंटाळून चौकशी अधिकारी पदाचा राजीनामा दिला, याचादेखील खुलासा करावा. तसेच विद्यापीठात विविध विचारसरणीचे प्राध्यापक, प्राचार्य यांची कोणाच्या आदेशाने प्रमुख समित्यांवर नेमणूक केली आहे, विद्यापीठात कंत्राट कोणाला व कोणाच्या शिफारसीने कोणत्या ठेकेदाराला देण्यात आले आहे, विद्यापीठातील अधिकारी गौड यांना पदावरून का काढले आदी प्रश्नांचा पुराव्यानिशी खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड़ कुणाल पवार, फार्मसी स्टूडंट कौन्सिलचे अध्यख भूषण भदाणे, गौरव वाणी, अभिषेक पाटील, विजय पाटील, श्रीनाथ पाटील, उमेश सोनार, सुनील शिंपी, गौरव पाटील, अनिरूध्द सिसोदे, अभिषेक धमाल आदींनी निवेदनाद्वारे केली होती़ तर हीच तक्रार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्यावतीने शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना करण्यात आली होती़
अन् रविवारी झाले पत्र प्राप्त
विद्यापीठाच्या प्रशासनाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे़ रविवारी राष्ट्रवारी काँग्रेस विद्यार्थी संघटनेला तसे पत्र प्राप्त झाले आहे़ तर तक्रारीची दखल घेवून ती तक्रार पुढील कार्यवाहीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागात पाठविण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे़
पुराव्यानिशी समोर येऊन खुलासा करावा
दरम्यान, विद्यापीठाकडून निवड आणि नियुक्त्या या कायदेशीर असल्याचा केलेला खुलासा एनएसयूआय संघटनेने अमान्य केला आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल विद्यापीठाने पुराव्यानिशी समोर येऊन खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. राष्ट्रीयीकृत बँक व जनता सहकारी बँक यामधील गैर ठेवींबद्दल विरोध असल्यामुळे वित्त अधिकारी कराड यांना संघशक्तीने पदावरून काढून टाकले, तर कुलसचिव बी.बी. पाटील यांनी स्वेच्छानिवृत्ती का घेतली, यासह व्यवस्थापन सदस्य दिलीप रामू पाटील यांची नियुक्ती झाली तेव्हा ते स्वत: जनता बँकेचे डिफॉल्ट होते, मग ते राज्यपाल नियुक्त कसे होऊ शकतात, आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.