चाळीसगावच्या सोलर कंपनीविरोधात न्यायालयात तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 08:29 PM2018-09-22T20:29:13+5:302018-09-22T20:30:08+5:30
बनावट महिला उभी करुन जमीन केली खरेदी
चाळीसगाव, जि.जळगाव : बनावट महिला उभी करुन सोलर कंपनीने जमीन खरेदी केल्याची तक्रार चाळीसगाव न्यायालयात दाखल झाली असून, विशेष म्हणजे ही महिला १८ वर्षापूर्वीच मृत झाली आहे. बनावट जमीन खरेदी करणाऱ्यांना कठोर शासन होऊन न्याय मिळावा, अशी मागणी तक्रारदार नजमाबी महम्मद (रा. बाराभाई मोहल्ला, चाळीसगाव) यांनी केली आहे. त्यांच्यातर्फे अॅड. सागर एस.पाटील यांनी बाजू मांडली.
याबाबत दाखल तक्रारीत म्हटले आहे की, नजमाबी यांचे माहेर पिंपरखेड येथील आहे. त्या अशिक्षित असून वडिलोपार्जित तसेच एकत्र कुटूंबाची रांजणगाव शिवारात गट क्र. ४८४/४, क्षेत्र सात हेक्टर ६२ आर अधिक पोट खराब तीन हेक्टर ४४ आर अशी एकूण ११ हेक्टर सहा आर एवढी शेतजमीन आहे.
त्यांच्या सातबारा उताºयावर १८ वषार्पूर्वी मृत बहिण जमतुनबी लतिफ (रा. आझाद नगर, धुळे) यांचेही नाव आहे. त्यांचा मृत्यू २००० मध्येच झाला आहे. अशी वस्तुस्थिती असताना नजमाबी महम्मद यांचा नात्याने भाचा असलेला हयासोद्दीन गयासोद्दीन व त्याचा मित्र नारायण भोसले (दोन्ही रा. पिंपरखेड) यांनी नजमाबी महम्मद यांना त्यांच्या मृत बहिणीची शेतजमिन नावे करायची असे खोटे सांगितले.
तहसील कार्यालयात कागदावर घेतला अंगठा
नजमाबी महम्मद यांना तहसील कार्यालयात घेऊन आल्यानंतर हयासोद्दीन गयासोद्दीन व नारायण भोसले यांनी एका कागदावर नजमाबी यांचा अंगठा घेतला आणि तयार केले. ज्यामुळे या एकत्रित शेतजमिनीचा मालक त्यांचा मृत भाऊ गयासोद्दीन महम्मद झाला. यानंतर १८ वर्षांपूर्वी मृत झालेल्या जमतुनबी लतिफ यांच्या जागी कुठल्या तरी बनावट महिलेला दुय्यम निबंधक कार्यालयात हजर करुन त्यांची शेतजमिन देखील लबाडीने हक्कसोड करुन घेतली.
सोलर कंपनीशी संधान
हयासोद्दीन गयासोद्दीन याने शेतजमिन विकण्याबाबत जे.बी.एम. सोलर पॉवर महाराष्ट्र प्रा. लि.तर्फे कुष्राग रामअवतार अग्रवाल यांच्याशी संधान साधले.
नजमाबी यांची न्यायालयात धाव
आपल्याच उताºयावरील आपलीच नावे कमी झाल्याचा प्रकार तक्रारदार नजमाबी महम्मद यांच्या लक्षात आला. त्यांनी सोलर कंपनीचे कुष्राग अग्रवाल व ज्ञानदेव ठुबे (रा. पुणे) यांच्याशी संपर्क साधला. ज्ञानदेव ठुबे यांनी नजमाबी यांना शेतजमिनीचे पैसे दिले नाहीत. तुमच्या हिश्श्याची एक तृतीयांश रक्कम जी होईल, ती आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही कुणावरही कारवाई करु नका. तुम्हाला एक तृतीयांश हिश्श्याची रक्कम आणून देईन, असे खोटे सांगितले.
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर नजमाबी यांनी पोलिसात तक्रार केली. मात्र अर्जाची चौकशी न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. तक्रारदार नजमाबी महम्मद यांची बाजू अॅड. सागर एस. पाटील यांनी मांडली.