डांभूर्णी उपसरपंच, पोलीस यांच्याविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:57+5:302021-06-17T04:12:57+5:30
मारहाण करून मोबाइल फोडला : बाथरूमचे बांधकाम तोडले जळगाव : डांभूर्णी, ता.पाचोरा येथील उपसरपंच संतोष नवल परदेशी यांच्यासह गावातील ...
मारहाण करून मोबाइल फोडला : बाथरूमचे बांधकाम तोडले
जळगाव : डांभूर्णी, ता.पाचोरा येथील उपसरपंच संतोष नवल परदेशी यांच्यासह गावातील आठ जणांकडून वेळोवेळी छळ, मारहाण होत असतानाही पिंपळगाव हरेश्वर पोलीस त्यांच्याविरुध्द कारवाई करीत नसल्याची तक्रार प्रतिभा प्रेमसिंग परदेशी (वय २५) या महिलेने बुधवारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली. स्वत:च्या मालकीच्या मोकळ्या जागेत घराजवळ १ जून रोजी बाथरूमचे बांधकाम करीत असताना संशयितांनी ते तोडले. त्याआधी देखील वेळोवेळी मारहाण झाली. पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद होते, त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याने या त्रासाला कंटाळून आपण उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र पतीने तातडीने औषधोपचार करून वाचविले. उपसरपंच व कंकराळा येथील संग्राम परदेशी मारायला आले असता मोबाइलमध्ये त्याचे चित्रण केले नंतर त्यांनी हा मोबाइल हिसकावून फोडून टाकल्याचे तक्रारीत नमूद आहे. संतोष शिवलाल परदेशी, सुरेखा संतोष परदेशी, राधाबाई महावीर परदेशी, शांतीलाल महावीर परदेशी, सुरेखा शांतीलाल परदेशी, संतोष नवल परदेशी (उपसरपंच), संग्राम ईश्वर परदेशी व माधुरी संग्राम परदेशी (रा.कंकराळा, ता.सोयगाव) यांच्याविरुध्द प्रतिभा परदेशी यांनी तक्रार दिली आहे.