भुसावळ येथे माजी आमदार संतोष चौधरींविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:14 AM2018-10-11T01:14:38+5:302018-10-11T01:15:32+5:30
साकेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये तुझा भाऊ असेल तेथून त्याला बोलावून आण व मी सांगेल त्या उमेदवाराला मतदान करायला सांग, अशी धमकी माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिल्याची तक्रार विनोद प्रताप ठाकरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात दाखल केली होती. दरम्यान, नंतर अर्जदाराने आपला अर्ज मागे घेतला असल्याचे डीवायएसपी गजानन राठोड यांनी सांगितले.
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये तुझा भाऊ असेल तेथून त्याला बोलावून आण व मी सांगेल त्या उमेदवाराला मतदान करायला सांग, अशी धमकी माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिल्याची तक्रार विनोद प्रताप ठाकरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात दाखल केली होती. दरम्यान, नंतर अर्जदाराने आपला अर्ज मागे घेतला असल्याचे डीवायएसपी गजानन राठोड यांनी सांगितले.
दरम्यान, माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी संपर्क केला असता साकेगाव सरपंच पदासाठी त्यांची मर्जी असेल तो सदस्य त्या उमेदवाराला मतदान करेल. माझा काही संबंध नाही व मी कोणासही धमकी दिली नाही, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे लहान दुकानाची जागा माझी असल्यामुळे मी त्या दुकानाच्या चाव्या मागितल्या. त्यांनी स्वत:हून आणून दिल्या, असे त्यांनी सांगितले.
साकेगाव सरपंचपदाची निवडणूक गुरुवारी ११ रोजी होत आहे. निवडणुकीसाठी माझे मोठे बंधू आनंद ठाकरे ग्रा.पं.सदस्य असून ते बाहेरगावी गेले आहे, असे ठाकरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तुझ्या भावाला मी सांगेल त्याच ठिकाणी मतदान करायला सांग व त्यास घरी बोलावून घे, असे चौधरी फोनवरून वारंवार सांगत होते. दरम्यान, मी फोन बंद केल्यानंतर ते माझ्या भुसावळ येथील जामनेर रोडवरील दुकानात येऊन शिवीगाळ करून माझे दुकान बंद करून दुकानाच्या किल्ल्या घेऊन गेले, तर छत्रपती शिवाजी महाराज दुकानातील दुसरे दुकानही ताब्यात घेण्याची धमकी दिली. ९ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास येथील एक नगरसेवक व काही गुंड प्रवृत्तीचे लोकही घरी येऊन गेल्याचे तक्रारमध्ये नमूद करण्यात आले आहे. या लोकांनी माझ्या भावाविषयी चौकशी करून तसेच महिलांना धमकावल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे. संबंधिताची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच माजी आ.चौधरी यांच्यापासून आमच्या जीवितास धोका असल्याचे तक्रारीत म्हटले होते. या दरम्यान, अर्जदाराने आपला अर्ज १० मिनिटातच मागे घेतला असल्याचे डीवायएसपी गजानन राठोड यांनी सांगितले.