नियमबाह्य नियुक्तीबाबत कुलपतींकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:16 AM2021-04-17T04:16:09+5:302021-04-17T04:16:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नुकतीच दोन अधिष्ठांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यपदावर नियुक्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नुकतीच दोन अधिष्ठांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ही नियुक्ती नियमबाह्य असून संबंधित व्यक्ती त्या पदासाठी पात्र नसल्याचा आरोप जिल्हा एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला आहे. या नियुक्ती सदंर्भात त्यांनी कुलपती व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.
शहादा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य राजेंद्र पाटील व धुळ्यातील पालेशा महाविद्यालयाचे प्राचार्य पी.पी.छाजेड यांची नुकतीच विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार व्यवस्थापन परिषद सदस्य पदाची पात्रता ही सदस्य हा विद्यापीठाचा अधिष्ठाता तसेच पूर्णकालीन वेतन अधिकारी असावा लागतो. पण, नियुक्तीची ही प्राथमिक अट सुध्दा नियुक्त झालेल्या सदस्यांकडे नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. तर नियुक्त झालेले सदस्य हे विद्यापीठाचे पूर्णकालीन वेतन अधिकारी अधिष्ठाता नसून नियुक्त सदस्यांकडे विद्यापीठाच्या कला व वाणिज्य विभागाचा प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यभार आहे. त्यामुळे त्यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यपदासाठी ते पात्र नसल्याचे देवेंद्र मराठे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, विद्यापीठाने केलेली ही नियमबाह्य नियुक्ती तात्काळ रद्द करावी. नियुक्ती रद्द न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.