प्रवेश रद्द करत तक्रारदार परतला परभणीला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:09 PM2019-10-15T12:09:44+5:302019-10-15T12:11:31+5:30
रॅगिंंग प्रकरण : डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले
जळगाव : सिनियर विद्यार्थ्यांकडून शनिवारी मध्यरात्री झालेल्या रॅगिंगच्या प्रकारानंतर तक्रारदार विद्यार्थी मुदस्सर मुख्तार इनामदार (वय-१९, रा़परभणी) याने सोमवारी इकरा युनानी महाविद्यालयातून प्रवेश रद्द करित मुळगावी परभणी येथे परतला़ दरम्यान, याप्रकरणाची महाविद्यालय प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत असून सात दिवसांच्या आत पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्यात येणार आहे.
काय घडले शनिवारी मध्यरात्री
परभणी येथील मुदस्सर इनामदार याला शासकीय कोट्यातून जळगाव-शिरसोली रस्त्यावरील इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता़ शुक्रवारी प्रवेश घेतल्यानंतर शनिवारी त्याच्या बॅचचा पहिलाच दिवस होता़ रात्री सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वसतिगृहात आपापल्या खोल्यांमध्ये गेले होते. यावेळी १५ ते २० सिनीयर्स विद्यार्थ्यांनी शनिवारी मध्यरात्री नव्याने दाखल मुदस्सर याच्यासह काही विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या एका हॉलमध्ये नेऊन त्यांची रॅगिंग केली़ यामध्ये विद्यार्थ्यांना विवस्त्र करून शिवीगाळ करण्यात आली़ हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही तर ट्युबलाईट अंगावर फोडण्याचीही धमकी देण्यात आली़ तर काहींना मारहाण करण्यात आली़ हा प्रकार रात्रीच मुदस्सर यांने कुटूंबियांना व महाविद्यालय प्रशासनाला कळविताच रविवारी सकाळी उघड झाला़ त्यानंतर ज्या तीन विद्यार्थ्यांना मुदस्सर याने ओळखले त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली़ तर या प्रकरणाची अॅन्टी रॅगिंंग समितीकडे सुध्दा तक्रार करण्यात आलेली आहे.
आणि.. महाविद्यालयातून प्रवेश केला रद्द
मुदस्सर इनामदार याने रविवारी पहाटेच कुटूंबियांना रॅगिंंगची माहिती दिल्यानंतर वडील मुख्तार व भाऊ डॉ़ मुजक्कीर यांनी सकाळीच जळगाव गाठले़ नंतर अॅन्टी रॅगिंग समितीकडे तक्रार करून पोलिसातही माहिती दिली़ दरम्यान, मुलासोबत घडलेला प्रकार हा पुन्हा होऊ शकतो, या भितीने वडील मुख्तार यांनी मुलाचा प्रवेश महाविद्यालयातून काढून घेण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार सोमवारी दुपारपर्यंत प्रवेश रद्दची प्रक्रिया पुर्ण करून मुदस्सर हा वडील व भावासह परभणीच्या दिशेने परतला.
सात दिवसांच्या आत अहवाल पाठविणार
रॅगिंगबाबत पालकाची तक्रार प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ़ शोएब शेख यांनी सोमवारी एमआयडीसी पोलिसांची भेट घेवून संपुर्ण प्रकाराची माहिती दिली़ आणि सात दिवसांच्या आत महाविद्यालयाकडून चौकशी अहवाल सादर करण्यात येईल, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले़ तसेच हा चौकशी अहवाल हा अॅन्टी रॅगिंग समितीकडे व विद्यापीठाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही डॉ़ शोएब शेख यांनी सांगितले़ विशेष म्हणजे, वसतिगृहात २८ नव्हे तर फक्त १७ विद्यार्थी असल्याचा महाविद्यालयाने दावा केला आहे.
डॉक्टर बनविण्याचे स्वप्न भंगले
मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहीले होते़ काबाडकष्ट करून मुलांचे शिक्षण केले़ मुलाचा इकरा युनानी महाविद्यालयात क्रमांक लागला़ परंतु, पहिल्याच दिवशी मुलासोबत रॅगिंगचा प्रकार घडला आणि तो भेदरला गेला़ पुन्हा असा प्रकार घडून बरे-वाईट झाले तऱ या भितीने महाविद्यालयातून मुलाचा प्रवेश रद्द करून घेतला आहे़ दरम्यान, या प्रकारामुळे मुलाचे शैक्षणिक नुकसान तर झालेच पण मुलाला डॉक्टर होण्याचे पाहीलेले स्वप्नही भंगले, असल्याच्या भावना मुदस्सर याचे वडील मुख्तार इनामदार यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले़ मुळगावी पोहचल्यावर पुढील शिक्षणाबाबत निर्णय घेवू असेही त्यांनी सांगितले़