कामात तत्परता नसलेल्या आठ अधिकाऱ्यांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:15 AM2020-12-22T04:15:40+5:302020-12-22T04:15:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमाबाबत पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन व महानगराध्यक्ष दीपक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ‘उपमहापौर आपल्या दारी’ उपक्रमाबाबत पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची परवानगी घेतली होती. त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला व नागरिकांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे उपमहापौर सुनील खडके यांनी आपल्या उपक्रमाबाबत सोमवारी मनपातील दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. मात्र, या पत्रकार परिषदेत आमदार सुरेश भोळे, स्थायी समिती सभापतींबाबत कोणतेही वाक्य किंवा पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देत न बोलताही उपमहापौरांनी भाजपची गटबाजी उघड केली आहे. दरम्यान, उपमहापौरांनी कामात तत्पर नसलेल्या आठ अधिकाऱ्यांची लेखी तक्रार मनपा आयुक्तांकडे केली आहे.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, मनपाचे आरोग्य सभापती चेतन सनकत, नगरसेवक अमित काळे, डॉ.चंद्रशेखर पाटील, किशोर बावीस्कर, मनोज अहुजा, ॲड. दिलीप पोकळे, माजी नगरसेवक मनोज काळे आदी उपस्थित होते.
प्रश्नांना उत्तर देणे टाळले
१. आमदार भोळे यांनी उपमहापौर यांच्या दौऱ्याबाबत ‘नव्याचे नऊ दिवस’ असतात असे वक्तव्य केले होते. याबाबत उपमहापौरांना प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नावर कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच शेतकरी असल्याने प्रत्यक्ष कामावर जाऊनच समस्या ऐकून घेतो असे सांगत, वेळ मारून नेली.
२. दौऱ्याबाबत उपमहापौरांनी पक्ष संघटनेला विश्वासात घेतले नसल्याने काही पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रार केल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमहापौरांनी माजी मंत्री गिरीश महाजन व भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्याकडून परवानगी घेतली असल्याचे सांगितले. तसेच आमदारांशी काही चर्चा झाली का? या प्रश्नावरही उपमहापौरांनी बोलणे टाळले.
३. उपमहापौरांनी काढलेल्या प्रेसनोटवर काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा नावाचा समावेश केला. मात्र, स्थायी समिती सभापतींचा नावाचा उल्लेख नसल्याच्या प्रश्नावरही उपमहापौरांनी बोलणे टाळले. तसेच हा उपक्रम उपमहापौरांचा असल्याने व स्थायी समिती सभापतिपद हे समकक्ष असल्याने त्यांचे नाव घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आठ अधिकाऱ्यांची केली तक्रार
दौऱ्यात रस्ते, गटारी व स्वच्छतेच्या समस्या आढळून आल्या. याबाबत काही तक्रारींचा निपटारा जागेवरच करण्यात आल्या, तर काही ठिकाणी अधिकाऱ्यांबाबतदेखील तक्रारी आल्या असल्याची माहिती उपमहापौरांनी दिली. याबाबत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे मनपातील चार अभियंता व चार आरोग्य निरीक्षक अशा आठ जणांची लेखी तक्रार केली असून, यांच्या कामात गती आणण्याबाबत सूचना दिल्याची माहिती उपमहापौरांनी दिली,
प्रभाग समितीत बसून समस्यांचा निपटारा करणार
येत्या दोन दिवसांत मनपाच्या प्रभाग समिती कार्यालयात जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितले. प्रभाग समितीत दररोज २ तास थांबून मुख्य समस्या जाणून समस्या सोडविणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितले.