एरंडोल पोलीस निरीक्षक व सावकाराविरुध्द मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 04:08 PM2017-11-29T16:08:21+5:302017-11-29T16:12:16+5:30
वरखेडी, ता.एरंडोल येथील भिकन दगडू पाटील (वय ५५) या शेतकºयाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या सावकार व एरंडोल पोलीस निरीक्षक यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत भावलाल हिलाल पाटील (रा.वरखेडी, ता.एरंडोल) यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२९ : वरखेडी, ता.एरंडोल येथील भिकन दगडू पाटील (वय ५५) या शेतकºयाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या सावकार व एरंडोल पोलीस निरीक्षक यांच्याविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत भावलाल हिलाल पाटील (रा.वरखेडी, ता.एरंडोल) यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
सावकार, त्याचे सहकारी व पोलीस निरीक्षक यांच्याकडून सातत्याने येणा-या दबावामुळे भिकन दगडू पाटील (वय ५५, रा.वरखेडी, ता.एरंडोल) या शेतक-याचा २० नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. दरम्यान, त्रास देणा-या या सर्व लोकांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा गावक-यांनी त्यावेळी घेतला होता, मात्र काही लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केल्याने अंत्यसंस्कार झाले होते. भिकन पाटील यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने भावलाल पाटील यांनी मुंबई येथे मंत्रालयात जावून मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली.
काय आहे प्रकरण
भिकन पाटील यांनी बंडू युवराज पाटील (रा.तळई, ता.एरंडोल ह.मु.भिवंडी) यांच्याकडून व्याजाने ६० हजार रुपये घेतले होते. या रकमेचे ४० हजार रुपये व्याज व मुद्दल ६० हजार असे एक लाख रुपये परत केल्यानंतरही त्यांच्याकडून व्याजासाठी धमक्या दिल्या जात होती. या प्रकरणाची सहकार विभागाकडे तक्रार केल्यानंतर सावकार बंडू पाटील, पत्नी अलका पाटील व मुलगा ज्ञानेश्वर पाटील यांच्याविरुध्द एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरही सावकाराचा जाच सुरुच होता.अशातच त्यांचा रक्तदाब वाढून मेंदूची रक्तवाहीनी तुटली. त्यामुळे त्यांना जळगाव व त्यानंतर मुंबई येथे दाखल करण्यात आले. तेथे ते कोमात गेले. घरी आणल्यानंतर त्यांचा सोमवारी रक्तदाब वाढून मृत्यू झाला. या काळात सावकार बंडू पाटील, दत्तू पाटील (आडगाव, ता.एरंडोल), पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे व ज्ञानेश्वर पाटील यांनी पैसे देण्यासाठी दबाव आणला होता. त्यामुळे या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.