आणखी एका पोलिसाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 11:24 PM2018-11-02T23:24:20+5:302018-11-02T23:26:26+5:30
आतापर्यंत जिल्ह्यातील पाच पोलिसांविरोधात महिलांशी गैरवर्तन केल्याने गुन्हे दाखल
जळगाव : विवाहित मुलीला भ्रमणध्वनी देऊन शिवीगाळ करुन तिला गुन्ह्याची धमकी देऊन विनयभंग केल्याप्रकरणी एका पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद रघुनाथ बागडे असे या पोलिसाचे नाव असून महिलांच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला हा जिल्ह्यातील पाचवा पोलीस आहे.
अमळनेर पोलिसात कार्यरत प्रमोद बागडे याने एका विवाहित मुलीला तिऱ्हाईत व्यक्तीकडून दोन भ्रमणध्वनी पाठविले. यानंतर तो तिला शिवीगाळ करुन वारंवार केस करण्याची धमकी देत होता. प्रमोद ३१ ऑक्टोबरला रात्री 10 वाजता पीडित महिलेच्या घरी गेला आणि त्याने तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद या विवाहितेच्या वडिलांनी दिली. त्यावरुन अमळनेर पोलिसात बागडेविरोधात कलम ४५१, ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान इनकॅमेरा जबाब देऊन महिला घरी गेल्यानंतर तिने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. यापूर्वी जिल्ह्यातील महिलांशी असभ्य वर्तन केल्याने चार पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यात परवेझ शेख, योगेश वाघ, सागर तडवी आणि विनोद अहिरे (सर्व जळगाव) या पोलिसांचा समावेश आहे.