जळगावमध्ये अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत आचारसंहिता भंगची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 06:29 PM2023-04-08T18:29:23+5:302023-04-08T18:30:03+5:30
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे.
कुंदन पाटील
जळगाव : संशोधन केंद्राला मान्यता देण्यासंदर्भात नियुक्त चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून भेट देणाऱ्या उमेदवाराकडून आचारसंहिता भंग झाली असून त्यांची वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळासाठी असलेली उमेदवारी रद्द करावी, अशी तक्रार डॉ.किशोर नीळकंठ बोरसे यांनी कुलगुरुंकडे केली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. दि. १० व ११ मार्च रोजी अभ्यास मंडळ अध्यक्ष पदाच्या निवडणुक होत आहेत. विद्यापीठ कायद्यानुसार एखाद्या अभ्यास मंडळाचे एकदा अध्यक्षपद उपभोगल्या नंतर लगेच त्या व्यक्तीस त्याच अभ्यास मंडळाचा अध्यक्ष होता येत नाही. याच आधारावर राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केलेल्या डॉ विजय तुंटे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला होता. असे असतानाही तशातच कुलगुरू कार्यालयातर्फे विविध विषयांच्या तदर्थ अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यात वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी डॉ.मधुकर भगवान पाटील यांची उमेदवारी आहे.
उमेदवार असतानाही शिंदखेडा महाविद्यालयात संशोधन केंद्राला मान्यता देण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदी डॉ.मधुकर भगवान पाटील यांची नेमणुक केली गेली. त्यानुसार शिंदखेडा महाविद्यालयास भेट दिली आणि कामकाज पाहून दि.६ एप्रिल रोजी अहवाल सादर केला. त्यांच्यासोबत सदस्य म्हणून डॉ.सुनील शरदचंद्र पाठक यांची नेमणूक झाली होती. डॉ.पाठक हे वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य असून ते मतदारदेखिल आहेत. त्यामुळे डॉ.पाटील यांनी केलेल्या आचारसंहिता भंगाविषयी गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्यांचा अध्यक्षपदासाठी असलेला उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी डॉ.बोरसे यांनी केली आहे.