भादली भुयारी मार्ग कामाची रेल्वे मंत्र्यांकडे कैफियत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:15 AM2021-04-25T04:15:39+5:302021-04-25T04:15:39+5:30
रेल्वे लाईन विस्तारीकरणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ चा मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग कायमस्वरूपी ...
रेल्वे लाईन विस्तारीकरणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ चा मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग कायमस्वरूपी बंद करण्याच्या हालचाली त्यावेळी गतिमान झाल्या होत्या. या संदर्भात लोकमतने भादली रेल्वे फाटक बंद झाल्यास शेतकऱ्यांनी शेतात जायचे कसे? याबाबतची सविस्तर व्यथा मांडून ऊहापोह केला होता. शेतकऱ्यांच्या समस्या रेल्वे प्रशासनासमोर मांडल्या होत्या. हा रस्ता कायमस्वरूपी बंद झाल्यास शेकडो एकर जमिनीवर शेतकऱ्यांना पाणी फेरावे लागणार होते.मात्र प्रशासनाने याबाबत तत्काळ दखल घेऊन पर्यायी मार्ग दिला होता. शेतकऱ्यांना सुमारे दहा किलोमीटर अंतराचा फेरा करून शेतात जावे लागणार होते. शेतकऱ्यांनी पुन्हा त्याला विरोध केला होता. पर्यायी मार्गाबाबत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची भूमिका व समस्येची दखल घेऊन आहे त्या जागेवरूनच भुयारी मार्ग करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करून आनंद व्यक्त केला होता. गेल्या एक-दीड वर्षापासून हे काम हे काम कासवगतीने सुरू आहे. अजून किती दिवस लांबच्या फेऱ्याने शेतकऱ्यांना शेतात जावे लागणार या विवंचनेत शेतकरी आहे. भुसावळ रेल्वे विभागाकडून लवकरच भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास जाईल, शेतकऱ्यांसाठी मार्ग खुला करण्यात येईल, असे आश्वासन दिले जात आहे, मात्र त्या ठिकाणी भुयारी मार्गासाठीचे सिमेंटचे बॉक्स तयार होऊन पडलेले आहे, पण बसवण्याचा मुहूर्त सापडणार की शेतकऱ्यांना फक्त ताटकळत ठेवणार की तारीख पे तारीख देणार? असा संतप्त सवाल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी केला आहे.