कर्जदारांचे शोषण करणाऱ्या २९९ सावकारांविरुद्ध तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:12 AM2021-01-09T04:12:31+5:302021-01-09T04:12:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील ११४ नोंदणीकृत खासगी सावकारांनी या हंगामात ६२ लाख ३२ हजार रुपयांचे कर्ज वाटप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ११४ नोंदणीकृत खासगी सावकारांनी या हंगामात ६२ लाख ३२ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील सर्वच १५ तालुक्यांमध्ये खासगी सावकार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकार एस.एस. बिडवई यांनी दिली आहे.
कोरोनानंतरच्या काळात अनेकांना पैशांची चणचण भासली. त्यावेळी बँकांकडे जाऊन कागदपत्रे जमा करण्यापेक्षा अनेकांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात ११४ खासगी आणि नोंदणीकृत सावकार आहेत. त्यांनी आतापर्यंत ६२ लाख ३२ हजार कर्ज वितरित केले आहे.
त्यातील अनेकांच्या वसुलीबाबत तक्रारीदेखील जिल्हा सहकार विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ज्या सावकारांच्या तक्रारी फक्त एकाच तालुक्यापुरत्या मर्यादित आहेत त्या तक्रारी तालुकास्तरावर वर्ग करण्यात आल्या आहेत, तर ज्या सावकारांच्या तक्रारी दोन तालुक्यांमध्ये आहेत त्यावर निवाडा हा जिल्हास्तरावर केला जात आहे.
जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी हे सहकारी बँका, विविध कार्यकारी सोसायटी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज घेतात, मात्र त्यासाठी लागणारी कागदपत्रे उपलब्ध नसतील तर हे शेतकरी खासगी सावकारांकडे वळतात. नोंदणीकृत सावकार असेल तर ठीक, अन्यथा व्याजाचे हप्ते भरूनच शेतकरी अडचणीत येतात.
जिल्ह्यात अवैध सावकारांची संख्या जास्तच
जिल्ह्यात नोंदणीकृत सावकार फक्त ११४ असले तरी त्याशिवाय व्याजाने पैसे देणारे सावकार जास्त आहेत. त्यांच्या व्याजाचा दरदेखील जास्त असतो. काही ठिकाणी दर महा पाच टक्के दराने पैसे दिले जातात. यामुळे शेतकरी किंवा जे लोक या खासगी सावकारांकडून कर्ज घेतात. त्यांच्या व्याजाचा आकडा फुगत जातो. ही अवैध सावकारीची काही प्रकरणे गेल्या वर्षांमध्ये समोर आली आहेत.
कर्जदारांच्या शोषणात वाढ
शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतल्यावर होत असलेल्या शोषणात वाढ झाली आहे. अवैध सावकारीविरोधातील कायदा अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातून २९९ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
अवैध सावकारीच्या २०२० मध्ये तक्रारी - १४
एकूण तक्रारी - २९९
एकूण प्रलंबित तक्रारी ३९
कार्यवाही पूर्ण झालेल्या तक्रारी २६०
सुनावणी सुरू असलेल्या तक्रारी २२