प्रलंबित गुन्ह्यांचा तपास पूर्ण करा - जिल्हाधिकारी राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:16 AM2021-04-21T04:16:32+5:302021-04-21T04:16:32+5:30
जळगाव : अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या ...
जळगाव : अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेत ही बैठक ऑनलाईन पार पडली.
त्यावेळी समितीचे सदस्य पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. केतन ढाके, सदस्य सचिव व समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एस. सपकाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गिरासे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहणार नाही. याकरीता पोलीस विभागाने अशा गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने करावा. दोषारोप पत्र पाठविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीमध्ये पीडितांना नियमानुसार अर्थसहाय्य तातडीने मंजूर करुन त्यांना देण्याच्या सूचना दिल्यात.
समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी मार्च अखेर अनुसूचित जातीची १२ तर अनुसूचित जमातीची १२ असा २४ गुन्ह्यांचा पोलीस तपास सुरू असल्याची माहिती दिली. त्यातील १६ गुन्ह्यांची निर्गती पोलीसांनी केली आहे. तर उर्वित आठ व मार्चमध्ये नव्याने दाखल ३ गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. मार्च मध्ये १६ पिडितांना मंजूर अर्थसहाय्याची १८ लाख ३९ हजाराची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.