मंजूर झालेल्या निधीतून तत्काळ कामे पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:25 AM2021-05-05T04:25:27+5:302021-05-05T04:25:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा नियोजन समितीमधून शहराच्या विकासासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या ६१ कोटी रुपयांच्या निधीतून, कामांचे नियोजन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा नियोजन समितीमधून शहराच्या विकासासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या ६१ कोटी रुपयांच्या निधीतून, कामांचे नियोजन त्वरित करून शहरातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर नियोजन करा, अशा सूचना महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मनपा अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
शहरातील रखडलेल्या विकासकामांबाबत आढावा घेण्यासाठी सोमवारी महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात मनपा अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसेवक प्रशांत नाईक, बांधकाम विभागाचे अभियंता अरविंद भोसले, मनपा प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, चंद्रकांत सोनगिरे, मनीष अमृतकर, नगरविकास शाखेचे साळुंखे, अमृत योजना विभागाचे बऱ्हाटे आणि इतर विभागातील अभियंते उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महापालिकेला डीपीडीसीमधून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या निधीतून लवकरात लवकर कामांचे नियोजन करून व निविदा प्रक्रिया राबवून पावसाळ्याआधीच कामांना सुरुवात करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
‘अमृत’, ‘मलनिस्सारण’ची अपूर्ण कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा
या बैठकीत अमृतअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेच्या कामांचादेखील आढावा घेण्यात आला. त्यात संबंधितांनी शहरातील कोल्हेनगर, चर्चच्या मागील भाग, अयोध्यानगर या भागांत अमृतची कामे जवळपास ९० टक्के पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यासह अनेक भागात टेस्टिंगचे कामदेखील पूर्ण झाले असून, आतापर्यंत शहरात एकूण ६० हजारांवर पाण्याचे कनेक्शन देणे आहे. मात्र, आजवर ३५ हजार कनेक्शन दिले गेले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. त्यावर महापौर महाजन यांनी पावसाळा सुरू होण्याआधी सर्व कामे पूर्ण करा म्हणजे आम्हाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांच्या कामांसाठी ‘डीपीडीसी’तून महापालिकेस दिलेल्या ६१ कोटी रुपये निधीतून वर्कऑर्डरप्रमाणे शहरातील रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करून जळगावकरांना दिलासा देऊन ऐन पावसाळ्यात होणारी त्यांची अडचण थांबवता येऊ शकेल, असे सांगितले.
मजीप्राचे अधिकारी गैरहजर
महापौर व उपमहापौर यांच्या बैठकीत अमृत अंतर्गत सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात येणार होता. याबाबत मक्तेदारांच्या अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनादेखील उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, मजीप्राचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याने महापौरांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच या पुढील बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचनादेखील महापौरांनी दिल्या आहेत.