जीएमसी वेळ पडल्यास पूर्णतः कोविड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:05+5:302021-03-20T04:15:05+5:30
जळगाव : कोरोना रुग्ण वाढत असताना, बेडचा मुद्दा गंभीर झाला असून, बेड वाढविण्याच्या नियोजनसंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी ...
जळगाव : कोरोना रुग्ण वाढत असताना, बेडचा मुद्दा गंभीर झाला असून, बेड वाढविण्याच्या नियोजनसंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तासभर बैठक घेतली. गरज पडल्यास या ठिकाणी पूर्णतः कोविड करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना डीसीएचसीमध्ये पाठवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ गंभीर रुग्णांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी डॉक्टरांना दिल्या आहेत. बेड वाढविण्यात येणार असे त्यांनी सांगितले. जीएमसीतील सात ते नऊ कक्ष तातडीने सुरू करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या आहेत.
पर्यायी व्यवस्था
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 22 टक्के डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर मनुष्यबळाचा मुद्दा काही प्रमाणात आहे. हे डॉक्टर बरे झाल्यानंतर हा मुद्दा काही अंशी निकाली निघेल, तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून आयुष किंवा अन्य एमबीबीएस डॉक्टरांची मदत घेऊन हा मुद्दा सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. डॉक्टरांच्या मनुष्यबळाचा मुद्दा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
डीसीएचसी असल्याने भुसावळला व्हेंटिलेटर नाही
भुसावळ येथे तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर हे डीसीएचसी असल्याने याठिकाणी व्हेंटिलेटर नव्हते, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
जीएमसी, जळगाव व डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथे ही सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. भुसावळ येथे उपचार पद्धती चांगली असून, आतापर्यंत साडेसातशे रुग्ण घरी गेल्याची माहिती त्यांनी दिली.
महिलांना शाहू महाराज रुग्णालयात हलविणार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल व प्रसूती झालेल्या महिला व बालकांना छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. जीएमसीत उपचार सुरू झाल्यानंतर ही व्यवस्था करण्यात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयातही बैठक घेऊन याबाबत सूचना दिल्या.