सादरीकरणातच नाटकाला पूर्णत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:06 AM2018-08-11T00:06:52+5:302018-08-11T00:07:10+5:30

ज्येष्ठ रंगकर्मी आणि मराठी रंगभूमीचे संशोधक, अभ्यासक, शिक्षक डॉ.हेमंत वसंत कुलकर्णी यांची ‘वेध नाटकाचा’ या सदरांतर्गत लेखमाला ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या लेखमालेचा आज पहिला भाग.

 Completion of plays in the presentation | सादरीकरणातच नाटकाला पूर्णत्व

सादरीकरणातच नाटकाला पूर्णत्व

googlenewsNext

नाटक म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर देताना अनेक विद्वानांनी नाटकाच्या आजवर केलेल्या व्याख्या सांगत बसण्यापेक्षा नाटकाचा नेमका अर्थ समजून घेणे जास्त गरजेचे आहे. नाटक ही एक कला आहे. नुसतीच कला म्हणण्यापेक्षा ती सादरीकरणाची कला आहे. सादरीकरणातच नाट्यकलेला पूर्णत्व आहे. नुसतं लेखकाने लिहून तिला अर्थ प्राप्त होत नाही तर नटांच्या द्वारे, तंत्राच्या सहाय्याने दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेक्षकांच्या साक्षीने तिला खरा अर्थ प्राप्त होत असतो. आजच्या तरुण पिढीला या भाषेत सांगणं म्हणजे जरा हेवी डोसच होईल.
आजच्या पिढीच्या भाषेत आपण याचा अर्थ तपासून पाहूया. कुठल्याही कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर किंवा कोणत्याही मल्टीप्लेक्समध्ये किंवा कोणत्याही मोबाइलवर, सी.डी.वर, पेन ड्राईव्हवर नाटक म्हणून जे काही दाखवलं जातं ते नाटक नाहीये. नाटक हा कला प्रकार स्क्रिनवर अनुभवता येत नाही. मुख्य म्हणजे तो इतका इझिली अव्हेलेबल नाही. करमणूक म्हणून आपली इच्छा झाल्यावर सहजगत्या बटन दाबल्यावर उपलब्ध होणारा नाही. नाटक हा जिवंत कला प्रकार आहे.
हा जिवंत कलाप्रकार बघणे ही एक प्रोसेस आहे, या प्रोसेसचा अर्धा भाग आपल्या नित्य सवयीचा आहे. सवयीचा भाग असा की, उदाहरण द्यायचे झाल्यास सिनेमा पहाण्यासाठी आपण स्वत: सिनेमागृहात जातो. तेथे त्या खेळाचे तिकीट काढतो आणि त्या सिनेमागृहात बसून काही काय म्हणजे तो सिनेमा संपेपर्यंत किंवा सहन होईपर्यंत आपण तो पहातो. सिनेमा पहाताना जे काही दिसतं ते भूतकाळात केलेल्या क्रियांचे चित्रीकरण पहात असतो आणि प्रत्येक सिनेमाच्या खेळात ते तसंच आणि तेवढंच दिसत असतं. पण नाटकाचं तसं नाही. नाटक हा पडद्यावर बघण्याचा कला प्रकार नाही. प्रेक्षागृहात पडद्यावर बघण्यापेक्षा पडदा उघडून आतील रंगमंचावर जो काही खेळ होतो तो खेळ बघण्यात अखरी गंमत आहे, जिवंत माणसांनी सजग प्रेक्षकांसमोर केलेला तो एक संघर्ष आहे आणि हा संघर्ष बघण्यासाठी म्हणून प्रेक्षक नाट्यगृहात जातात. खिशातले चार चव्वल खर्च करून स्वत:ला काही काळ अंधारात गाडून घेत समोर रंगमंचावर माणसांनी प्रत्यक्ष केलेला भावभावनांचा खेळ बघतात. खेळ बघताना हसतात, रडतात, स्तब्ध होतात, अंतर्मुख होतात आणि मग खेळ संपला, रंगमंचाचा पडदा खाली आल्यावर भारलेल्या अवस्थेत नाटकाची आठवण मनात साठवत घरी परततात.
मनुष्यप्राण्याला आपल्याला आलेला अनुभव दुसऱ्यासोबत शेअर करायची सवय फार जुनी आहे. अगदी तो मनुष्यजीव अस्तित्वात आल्यापासून आहे, नाटक तरी दुसरं काय आहे? कोणाला तरी आलेला अनुभव लेखक आपल्या शब्दात मांडतो, नट ते शब्द घेऊन आपल्या देहबोलीद्वारे तो अनुभव अनेकांपर्यंत पोहोचवत असतात.
मुख्य मुद्दा असा की हे अनुभवाचं प्रगटीकरण प्रत्यक्ष होत असतं. ते काही शूट करावं लागत नाही की, कोणत्याही स्क्रिनवर ते दिसत नाही. जे घडतं ते याची देही याची डोळा होतं. म्हणूनच हा नाटकाचा खेळ इतर कलांच्या तुलनेत आगळा वेगळा आहे. हा खेळ एकदा खेळून संपत नाही. तो त्याच्या प्रयोगागणिक रोज खेळला जातो. हा खेळ कधी हौसेपोटी खेळला जातो तर कधी अभ्यास म्हणून नाटकाचा प्रयोग होतो, तर कधी हा खेळ करून चार पैसे मिळावेत म्हणून केला जातो. प्रयोगाच्या गरजेनुसार त्या नाटकाला तशी बिरुदं लावली जातात. हौशी रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी वगैरे.
-डॉ.हेमंत वसंत कुलकर्णी, जळगाव

Web Title:  Completion of plays in the presentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.