जळगावातील बालक मृत्यू प्रकरणात वाढली गुंतागुंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:19 PM2019-06-04T12:19:12+5:302019-06-04T12:19:43+5:30
नुकतेच जन्माला आलेले बाळ विकल्याचीही चर्चा
जळगाव : रामेश्वर कॉलनीत मद्यपी तरुणाने छातीत लाथ मारल्याने तीन वर्षाच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणात आठवडा उलटला तरी अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा संशयिताला अटक झालेली नाही. दरम्यान, या बालकाच्या मातेने व त्याला लाथ मारणाऱ्याने एका आठवड्याच्या बाळाची विक्री केल्याचीही माहिती समोर येत आहे. हे बाळ नेमके कोणाचे होते? त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कैलास अशोक माळी हा आशाबाई, तिचा मुलगा महेश (वय ३) व तीन मुलींसह रामेश्वर कॉलनीतील यशोदा नगरात भाड्याच्या घरात वास्तव्यास होता. २८ मे रोजी महेश हा त्याच्याजवळ लाडाने आला. तेव्हा कैलास याने महेश याच्या छातीत लाथ मारली. त्यात तो लांब फेकला गेला व झटके येत असल्याने दवाखान्यात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच रस्त्यात त्याचा मृत्यू झाला होता. कैलास याने लाथ मारल्यामुळेच मृत्यू झाल्याचे बाळाच्या मातेचे म्हणणे आहे. या प्रकरणात खून किंवा सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल न करता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. तर घटनेनंतर पोलिसांनी संशयित कैलासचा शोध घेतला असता तो फरार झाला होता.
बाळ विक्रीबाबत उलटसुलट चर्चा
मृत बाळाच्या आईने या घटनेच्या आठवडाआधी बाळाला जन्म दिला होता व त्याच दोघांनी विक्री केल्याची चर्चा आहे. एक पोलीस अधिकारी घटनास्थळावर चौकशीसाठी गेला असता तेथे शेजारील महिलांनी ही माहिती पोलिसांना सांगितली. याबाबत पोलीस उघडपणे बोलायला तयार नाही. महिलांच्या सांगण्यात खरोखर तथ्य असेल हा प्रकार अतिशय गंभीर आहे. नसेल तर अशी चर्चा पसरविण्यामागे नेमका कोणाचा काय हेतू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे सत्य बाहेर आणणे गरजेचे आहे.
गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य कमी
लहान मुलाचा जीव गेल्याचा गंभीर गुन्हा असताना या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करुन पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्यच कमी केल्याची टीका होत आहे. मृत बाळाची आई पतीला सोडून कैलाससोबत ‘लिव्ह इन रिलेशिनशीप’मध्ये राहत होती. बाळाची आई स्वत: बाळाच्या मृत्यूस कोण जबाबदार आहे असे सांगत असतानाही तिची दखल घेतली गेली नाही. याच पोलीस ठाण्यात केवळ राजकीय दबावापुढे झुकून एका तरुणावर गेल्या महिन्यात खोटा व गंभीर गुन्हा दाखल झाला आहे तर दुसरीकडे सत्य घटना असूनही गुन्हा दाखल न करता अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. दोन घटनामधील स्थिती पाहता कायद्याचा वापर कसा होतोय, यावरही आता चर्चा होऊ लागली आहे.
शवविच्छेदन अहवालात मृत्यू नेमका कशामुळे झाला हे देण्यात आलेले नाही. व्हिसेरा व हिस्टोपॅथॉलोजी राखीव असून धुळे व नाशिक येथे प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आलेले आहेत.तेथून मृत्यूचे कारण कळेल. त्यानंतरच गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. बाळ विक्री प्रकरण माहिती नाही, त्याचीही चौकशी केली जाईल.
-रणजित शिरसाठ, पोलीस निरीक्षक, औद्योगिक वसाहत पोलीस ठाणे.