भावभोळया भक्तीची ही एक तारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:17 PM2020-03-31T23:17:15+5:302020-03-31T23:17:44+5:30
मनुष्य हा पृथ्वीवरील स्वार्थी प्राणी आहे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यात तो फक्त स्वार्थ पहातो. अध्यात्मामध्ये सुद्धा देवाला हात जोडतो ...
मनुष्य हा पृथ्वीवरील स्वार्थी प्राणी आहे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यात तो फक्त स्वार्थ पहातो. अध्यात्मामध्ये सुद्धा देवाला हात जोडतो ते फक्त काही मागण्यासाठी. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठला मीच स्वरा अपराधी.... या भक्ती गीतात सांगितल्याप्रमाणे मनात भक्ती भाव न ठेवता फक्त देवाने इच्छा पूर्ण करावी हाच ध्यास मनुष्य घेत असतो. खरं तर भगवंत भाव, भक्तीचाच भुकेला आहे. जो कोणी त्याला शुद्ध अत:करणाने अर्पण करतो ते तो आनंदाने स्वीकारतो. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये हेच सांगितले आहे.
शबरीने भक्ती पूर्वक अर्पण केलेली बोर रामाने मोठ्या आवडीने स्वीकार करून खाल्ले. इतकेच काय तर रिकामे झालेल्या अक्षय पात्रातून उरलेल्या भाजीचा एक कण खाऊन भगवंतांनी ऋतू कालोत्स पुष्पाणी समर्पयामी, असे म्हणून त्या-त्या ऋतूत आलेल कोणतेही फुल भगवंताला अर्पण केले तरी भगवंत ते फुुल आनंदाने स्वीकरतो.
भगवंताला काहीच नाही तर रोज पाणी जरी अर्पण केले तरी तो ते आनंदाने स्वीकारतो, पण त्यात भक्ताची भाव भक्ती असायला हवी. सुदामाने आणलेली पोहयाची गाठोडी घेऊन त्या भक्तीच्या पोह्याची गाठ भगवंतांनी स्वत:च्या हाताने सोडली आणि मुठभर पोहे खाऊन तृप्त झाले, अशी अनेक उदाहरणे देता येतील जी भगवंतांनी गीतेच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे. मनुष्याने स्वार्थ सोडून जगाच्या कल्याणाचा विचार करून भगवंत भक्ती केल्यास मनुष्याचा स्वत:चा उत्कर्ष होईल. अनेक महात्मा लोकांनी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या आपल्या जीवनात उतरवायच्या आहेत. त्याचबरोबर केवळ आपल्यापर्यंत सीमित न ठेवता हा ज्ञानरूपी प्रकाश जेवढ्यांना देता येईल. त्यांनाही ही ऊर्जा आणि प्रेरणा द्यायची आहे. आपल्या बुद्धीमध्ये, विचारांमध्ये व्यवहारांमध्ये अंगीकार करून, गोड वाणीद्वारे कोणाचे मन न दुखवता ही प्रेरणा दिली पाहिजे.
-नाना महाराज कुलकर्णी, पिंप्राळा