पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:54+5:302021-06-20T04:12:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेल्या ३० ते ४४ वयोगटाच्या लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेल्या ३० ते ४४ वयोगटाच्या लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात करण्यात आली. मात्र, पहिल्या दिवशी या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सुमारास काही केंद्रांवर गर्दी झाली होती. मात्र, दुपारी केंद्रांवर शांतता होती, असे चित्र होते.
शहरातील महापालिकेच्या ५ व रेडक्रॉस व रोटरी भवन अशा सात केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटासाठी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस उपलब्ध होता. तर अन्य केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांचे नियमित लसीकरण सुरू होते. दरम्यान, पहिलाच दिवस असल्याने नागरिक न आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, सोमवापासून गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रांची संख्या वाढविण्यात आल्याने केंद्रनिहाय गर्दी कमी झाल्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले. मध्यंतरी केंद्र कमी असल्याने गर्दी वाढली होती, असे ते म्हणाले.
असे होते केंद्रावर चित्र
१ रेड क्रॉस : रेड क्रॉस रक्तपेढीच्या केंद्रावर सकाळी १० वाजेपर्यंत ५० जणांचे लसीकरण झाले होते. गर्दी नियंत्रणात होती. नियमितप्रमाणेच नियोजन करण्यात आले होते. दुपारी ११ वाजेनंतर गर्दी ओसरली होती.
२ छत्रपती शाहू महाराज रुग्णालय: या केंद्रावर कुपन वाटण्यात आले होते. काही नागरिकांनी सकाळी ६ वाजताच या केंद्रावर हजेरी लावली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे शंभर लाभार्थी हे केंद्राबाहेर थांबून होते. सकाळी ११ वाजेपर्यंत १०५ जणांची नोंदणी झालेली होती.
३ रोटरी भवन : रोटरी भवन येथील केंद्रावर सकाळी ७ वाजता कुपन देण्यात आले होते. कुपनवर वेळ दिलेली असल्याने दुपारी गर्दी कमी होती. वेळेनुसार नागरिक लसीकरणाला येत होते. शिवाय बाहेर फलक लावून सकाळी ७ वाजता कुपन मिळतील, अशी सूचनाही देण्यात आली होती.
४ काशिबाई कोल्हे विद्यालय व कांताई नेत्रालय, शाहीर अमरशेख, डी. बी. जैन या केंद्रावर नियमित प्रमाणेच लसीकरण सुरू होते.