जामनेर येथून संगणक व हार्डडीस्क ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:17+5:302021-06-18T04:12:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर : बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्याशी संबंधित जामनेर व परिसरातील राजकीय कार्यकर्त्यांवर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्याशी संबंधित जामनेर व परिसरातील राजकीय कार्यकर्त्यांवर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने फास आवळला असून माजी मंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे पंचायत समितीचे माजी सभापती छगन झाल्टे, जामनेर शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील व तळेगाव (ता. जामनेर) येथील कापूस व्यापारी राजेश लोढा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने
त्यांच्या घरांची व कार्यालयाची तपासणी करण्यात आली.
दरम्यान, छगन झाल्टे व राजेश लोढा यांना जामनेर पोलीस ठाण्यात आणण्यात येऊन चौकशी करण्यात आली व अटकेची नोंद केल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली.
पुणे येथील पथकाने तपासणीत कॉप्युटर व हार्डडिस्क ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुका शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र रमेश पाटील यांना पोलिसांनी औरंगाबाद येथे तर माजी सभापती छगन झाल्टे, कापूस व्यापारी राजेश लोढा यांना जामनेर येथून ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी सकाळपासूनच ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची घरे व कार्यालयावर पोलिसांची नजर होती. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपासणी करण्यात आली.
बीएचआर घोटाळ्यानंतर कर्जदारांच्या जप्त झालेल्या मालमत्ता राजकीय वरदहस्त असलेल्यांनी कवडीमोल भावात खरेदी केल्या. तर ठेवीदारांना नाममात्र रक्कम देऊन त्यांच्या पावत्या घेऊन त्यांवर आपले भले करून घेणारे शहरातील काही सावकार पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली. आजच्या कारवाईनंतर असे आर्थिक व्यवहार करणारे भयभीत झाले असून, यात फत्तेपूर, पहूर, शेंदुर्णी व तळेगाव येथील काहींचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे.
कोण आहे जितेंद्र पाटील?
जामनेर येथील माजी मंत्र्यांचे निकटवर्तीय, त्यांच्या राजकीय व आर्थिक बाबी सांभाळणारे अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या पत्नी नगरसेविका असून ते तालुका शिक्षण संस्थेचे सचिव आहेत.
छगन झाल्टे
झाल्टे पंचायत समितीचे माजी सभापती व माजी नगरसेवक आहेत. तळेगाव येथील राजेश लोढा कापूस व्यापारी आहेत. त्यांची शिक्षण संस्था आहे. बीएचआरशी त्यांचा जवळचा संबंध आहे. ठेवीदारांच्या मालमत्ता व पावत्यांबाबतच्या व्यवहारात त्यांच्या संबंधाबाबत उलटसुलट चर्चा होती.