ढगाळ वातावरणामुळे जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:05 PM2018-03-15T13:05:47+5:302018-03-15T13:05:47+5:30
दोन आठवड्यात तिस-यांदा ढगाळ वातावरण
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १५ - शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होऊन पुन्हा शेतकºयांची चिंता वाढविली आहे. गुरुवारी सकाळी काही भागात पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. तीन आठवड्यांपासून अधून मधून वातावरण बदलत असल्याने शेतमालाचे नुकसान होण्यासह आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात आहे.
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चार-पाच दिवसाआड ढगाळ वातावरण होत आहे. सोबतच पावसाचाही शिडकाव होत आहे. उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा हवामानावर परिणाम होऊन दोन आठवड्यांपासून अशी स्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. ५ मार्च रोजी ढगाळ वातावरणासह पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा ११ मार्च रोजी तशीच स्थिती होती. आता पुन्हा १५ मार्च रोजी सकाळपासूनच शहरात व जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सोबतच जळगाव शहरातील काही भागासह रावेर तालुक्यात पावसाचा शिडकावा झाला.
बहुतांश ठिकाणी गहू, हरभरा काढणीचे काम शेतकºयांनी पूर्ण केले आहे. तर काही ठिकाणी सुरू आहे. बाजरी, ज्वारीही काढण्यात आली आहे. मक्याची काढणी मात्र बाकी आहे. त्यातच गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होत असल्याने शेतकरी चिंतीत झाले आहे.
याबाबत कृषी विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता रेकॉर्डवर घेण्याइतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे त्याचा पिकांवर परिणाम होणार नाही. तसेच बहुतांश पीक काढले गेले आहे. किंवा काढणी सुरू आहे. त्यामुळे ढगाळ हवामानाचा त्यावर परिणाम होण्याची भीती नाही. फक्त जोरदार पाऊस आल्यास मात्र या काढणी सुरू असलेल्या पिकावर डाग पडण्याची व ते पीक खराब होण्याची भिती असल्याचे त्यांनी सांगितले.