३१ मार्च मुद्रांक शुल्क भरल्यास चार महिने दस्त नोंदणीस सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:16 AM2021-03-26T04:16:51+5:302021-03-26T04:16:51+5:30
जळगाव : राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणी कार्यालयांमध्ये प्रचंड ...
जळगाव : राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणी कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन पोलीस व प्रशासनाकडून केले जात असून दुसरीकडे सवलतीची मुदत संपत असल्याने गर्दी होऊ नये व लोकांना सवलतीचा फायदा घेता यावा, यासाठी ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरा आणि पुढील चार महिन्यांत कधीही दस्त नोंदणी करण्याचा पर्याय नागरिकांना देण्यात आला आहे.
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी खरेदीदारांना मालमत्तांच्या व्यवहारांसाठी प्रोत्साहन देऊन बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात ३ टक्के, तर १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के सवलत दिली आहे.
पहिल्या टप्प्यातील सवलत योजनेला संपूर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यातही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. सवलतीचा दुसरा टप्पा ३१ मार्चला संपत असल्याने नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून दस्त नोंदणीसाठी गर्दी केली आहे. कोरोना परिस्थिती असल्याने गर्दी टाळण्यासाठी शासनाकडून वारंवार आवाहन केले जात असताना केवळ सवलत योजनेची मुदत संपत असल्याने दस्त नोंदणी कार्यालये दस्त नोंदणीसाठी गजबजलेली पाहायला मिळत आहेत.
या सवलतीचा आता खरेदी–विक्री तसेच बक्षीसपत्र करू इच्छिणाऱ्यांना लाभ होणार आहे. ज्यांनी ३१ मार्चपर्यंत शुल्क भरले आहे. त्यांना पुढील ४ महिन्यांमध्ये दस्त नोंदणी करता येणार असल्याने याचा विशेषत्वाने फायदा घ्यावा. तसेच नागरिकांनी आता मुद्रांक शुल्काचा भरणा केल्यास पुढील चार महिन्यांत त्यांना दस्त नोंदणी करताना सध्याच्या सवलतीचा फायदा घेता येऊ शकेल, असे सह जिल्हा निबंधक वर्ग तथा, मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.