कोथळी येथे संत मुक्ताबाई पादुका स्वस्थळी गाभाऱ्यात विराजमान करून आषाढी वारीची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 04:24 PM2020-07-24T16:24:40+5:302020-07-24T16:26:03+5:30
यंदाची आषाढी परतवारी श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी आगमन सोहळ्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जुने मंदिरात संत मुक्ताबाई पादुका विराजमान करून काल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता झाली.
विनायक वाडेकर
मुक्ताईनगर, जि.जळगाव : यंदाची आषाढी परतवारी श्री संत मुक्ताबाई पादुका पालखी आगमन सोहळ्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत जुने मंदिरात संत मुक्ताबाई पादुका विराजमान करून काल्याच्या कीर्तनाने आषाढी वारीची सांगता झाली.
दरवर्षी संत मुक्ताबाई पालखी आगमन सोहळा मुक्ताईनगर, कोथळी, सालबर्डी व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहभागातून भव्य आणि दिव्य साजरा होतो. दिंडी स्पर्धांमध्ये दिडशेवर भजनी मंडळ सहभागी होत असतात, पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. अनंत अडचणी येऊनही केवळ परंपरेच्या उपासकामुळेच ही परंपरा अखंडित राहिल्याचे याप्रसंगी रवींद्र हरणे महाराज यांनी सांगितले.
तब्बल ५६ दिवसांनी आज परंपरागत तिथीनुसार नवीन मंदिर येथून पालखी मुख्य समाधी मंदिर कोथळी येथे आणण्यात आले. त्यावेळी गुलाबपुष्प वर्षावात स्वागत करण्यात आले.
नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी पालखी पूजन केले. पादुकांना पंचामृताने अभिषेक व आरती विश्वस्त पंजाबराव पाटील यांनी सपत्नीक केली. मुक्ताबाई-मुक्ताबाई जयघोषात संत मुक्ताबाई पादुकांना गाभाºयात विराजमान करण्यात आले.
पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ।।
घरा आली घरा आली । घरा आली मुक्ताबाई।।
या अभंगाप्रमाणे ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे यांनी काल्याचे कीर्तन केले व आषाढी वारीची सांगता झाली. मंदिर परिसर रांगोळी तोरणे पताका लावून सजविला होता.
यावेळी संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार चंद्रकात पाटील, तहसीलदार श्याम वाडकर, नरेंद्र नारखेडे, योगेश भावसार, कोथळी उपसरपंच उमेश राणे, बारसू खडसे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, विनायक पाटील, श्रीकांत पाटील, विशाल सापधरे, सम्राट पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, नगरसेवक संतोष मराठे, अन्नदाते नीना काठोके तसेच मुक्ताई फडावरील महाराज मंडळी व भाविक उपस्थित होते.
हरणे महाराजांचे कीर्तन
आपल्या कीर्तनात ह.भ.प. रवींंद्र हरणे महाराज यांनी परंपरेचे उपासकांनामुळेच पालखी सोहळा टिकून आहे. सोहळा किंवा मंदिर उभारणे कठीण नाही. परंतु ती परंपरा पुढे चालू ठेवणे हे कठीण असते. संत मार्गाने अंधानुकरण केले आणि संतांच्या विचारानुसार कृती केली तरी जीवन सफल होते. जीव हा अपूर्ण आहे म्हणून पूर्णत्व असलेल्या भगवंत रुपाकडे आपण ध्यान लावले पाहिजे आणि प्रसाराचे पृथक्करण करून सार असलेल्या भगवंतामध्ये आपण लिन झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.