श्रीक्षेत्र मेहुण येथे मुक्ताई गुप्तदिन सोहळ्याचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 05:52 PM2019-05-31T17:52:56+5:302019-05-31T17:54:14+5:30
श्री क्षेत्र मेहुण येथे तापी नदीच्या किनाऱ्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत आदिशक्ती मुक्ताई गुप्तदिन सोहळ्याची सांगता गुरुवारी झाली.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : श्री क्षेत्र मेहुण येथे तापी नदीच्या किनाऱ्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत आदिशक्ती मुक्ताई गुप्तदिन सोहळ्याची सांगता गुरुवारी झाली. त्यात श्री यज्ञेश्वर आश्रमाचे अध्यक्ष शारंगधर महाराज मेहुणकर यांचे काल्याचे कीर्तन झाले.
‘प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही अवतारी पुरुष असल्याने त्यांचे नामस्मरण आपण नेहमी केले पाहिजे. यापैकी प्रभू श्रीरामाच्या चरित्राचे आचरण तर श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायला हवा. कारण श्रीकृष्ण चरित्र उच्चाराने परमसुखाची प्राप्ती होत असल्याचे प्रतिपादन शारंगधर महाराज मेहुणकर यांनी केले.
गवळीयाने ताक पिले या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर चिंतन करून त्यांनी श्रीकृष्ण लीलांचे कथन केले. ते आपल्या कीर्तनात म्हणाले की, लौकीक अर्थाने पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे खाद्यपदार्थ एकत्र कालविणे म्हणजे काला होय. गोकुळात श्रीकृष्णाने गायी चारताना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोºया एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. मात्र अलौकिक अर्थाने जीवशिवाचे ऐक्य म्हणजे काला होय. असा काला जीवनात आनंदाची प्राप्ती करून देत असतो. गोपाळकाला म्हणजे पांढºया रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला संचय होय. गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कायार्चे प्रतिनिधित्व करतो. पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहे. भगवंतांची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रेम व भक्तीचा मिलाप व्हायला हवा. गोपाळांकडे असलेल्या नवविधा भक्तीत भगवंताने आपली कृपा कालवून जो काला तयार केला, त्याच्या सेवनाने गोपाळांना परमानंदाची प्राप्ती झाली. स्वर्गीय देवादिकांनाही काला दुर्मिळ आहे. प्रेममय भक्तीतून होणारा काला सेवन करून आनंद मिळवावा किंबहुना सुखाची प्राप्ती करून घ्यावी, असे आवाहनही शारंगधर महाराज मेहुणकर यांनी केले.
संत मुक्ताई यांचा ७२३ वा गुप्तदिन सोहळा
श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांच्या गुप्त होण्याला ७२२ वर्षे पूर्ण झाली. यंदा ७२३ वा गुप्तदिन सोहळा १९ ते ३१ मे दरम्यान पार पडला. त्यानिमित्त सुरेश महाराज व कडू महाराज जंगले यांनी ज्ञानेश्वरी पारायण केले. सप्ताहात विविध कीर्तनकरांची कीर्तने झाली.
पंढरपूरसाठी ४ रोजी दिंडी रवाना
दरवर्षाप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र मेहुण ते श्रीक्षेत्र पंढरपूरसाठी श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांचा पायी दिंडी पालखी सोहळा पालखीचालक सुधाकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, ४ जून रोजी मेहुण तापीतीर येथून रवाना होणार आहे. शेकडो भाविकांच्या सहभागाने ही दिंडी मजल दरमजल करत ९ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल.